Published On : Sat, Jan 25th, 2020

मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य – श्रीकांत फडके

Advertisement

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त रॅलीचे आयोजन

नागपूर: सुदृढ व सक्षम लोकशाहीसाठी देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे गरजेचे आहे. मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणे असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी केले.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आज राष्ट्रीय मतदान दिवसानिमित्त आयोजित जनजागृती कार्यक्रमात श्री.फडके बोलत होते.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती राजलक्ष्मी शहा, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, मतदार नोंदणी अधिकारी डॉ.सुजाता गंधे, श्रीमती हेमा बढे, श्रीमती शिवनंदा लंगडापुरे, ज्ञानेश भट, शेखर घाडगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची प्रतिज्ञा श्रीकांत फडके यांनी उपस्थितांना यावेळी दिली.

या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज ‘सशक्त लोकशाहीकरिता निवडणूक साक्षरता’ या रॅलीला श्री. फडके यांनी हिरवी झेंडी दाखविली. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयातून मार्गस्थ होऊन संविधान चौक येथे आली. येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सेंट उर्सुला हायस्कूल येथे या रॅलीचा समारोप झाला.

भारत निवडणूक आयोगाने “सक्षम लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता’ ही यावर्षीच्या राष्ट्रीस मतदार दिनाची संकल्पना निश्चित केली आहे. याबाबत श्री. फडके म्हणाले, निपक्ष निवडणुकांमुळे आपली लोकशाही आजही सुदृढ आणि सशक्त आहे. जगातील सर्वात मोठा लोकशाही असणाऱ्या आपल्या देशातील निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची आणि जोखमीची आहे. सर्वांच्या सहकार्याने आपल्या येथे निवडणूका सुरळीतपणे पार पडल्या. मतदारांचे मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात आले. दिव्यांगासाठी सोयीसुविधा उभारण्यात आल्या. तसेच स्तनदा मातांसाठी देखील मतदान केंद्रांपर्यंत पोहचविणे, व्हील चेअर यासारख्या सोयी-सुविधा पुरविल्यामुळे यावर्षी मतदान प्रक्रियेत महिलांची संख्या वाढली. ही बाब निश्चितच प्रशंसनीय आहे. निवडणूका संपल्यावर मतदार नोंदणीची प्रक्रिया निरंतर सुरुच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

श्रीमती राजलक्ष्मी शहा म्हणाल्या, 2011 पासून राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने नवमतदारांमध्ये लोकशाहीतील सहभागाबद्दल माहिती दिली जाते. मतदार म्हणून आपल्याला असलेल्या अधिकाराबाबत नागरिकांनी जागृत राहिल्यास लोकशाही व्यवस्था अधिक बळकट होईल. मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु असून दिनांक 1 जानेवारी 2020 या अहर्ता दिनांकानुसार वयाची 18 वर्षे पूर्ण असलेल्या तरुणांनी आपली मतदार नाव नोंदणी करावी, तसेच मतदार ओळख पत्रातील तपशीलामध्ये सुधारणा असल्यास 13 फेब्रुवारी 2020 पर्यंत करुन घ्याव्यात, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

धरमपेठ एम.पी.देव मेमोरियल सायन्स महाविद्यालयातर्फे चमुने ‘मतदार साक्षरता’ पथनाट्य सादर केले. मान्यवरांच्या हस्ते पथनाट्य समुहाला मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रत्येक मतदार संघात उल्लेखनीय कार्य केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन यावेळी गौरव करण्यात आला. यामध्ये संजय आत्राम, आरआर.गजभिये, श्रीमती उषा शेंडे, उमाकांत बन्सोड, विजय मुंदडा, सुदर्शन लघव, अजय बालपांडे, एम.डी.घोटेकर, अशोक चवरे, आय.एन.निकोसे, सुधाकर लंगडे तसेच स्वप्निल पांडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दिव्यांग मित्र म्हणून निवडणुकीदरम्यान भरीव कामगिरी करणारे अमोल अंभोरे, संजय पुसाम, बालाजी वर्जे यांना देखील सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच नवमतदारांना त्यांच्या ओळख पत्राचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती राजलक्ष्मी शहा यांनी तर संचालन तहसीलदार (निवडणूक) राहूल सारंग यांनी केले.

Advertisement
Advertisement