Published On : Sat, Jul 20th, 2019

नाविन्‍यपूर्ण उपक्रमांना बँकांचे अर्थसहाय्य मिळावे

केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

नागपूर येथे इंडियन बँकेच्‍या क्षेत्रीय कार्यालयाचे गडकरींच्‍या हस्ते उद्घाटन

नागपूर: आर्थिक विकासात बँकांचे योगदान महत्‍वाचे असून त्‍यामूळे सामाजिक आर्थिक परिवर्तन घडते. ई-वाहने, जैव-इंधन निर्मिती यासारख्‍या नाविन्‍यपूर्ण उपक्रमांना बँका^चे आर्थिक सहाय्य मिळणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आज नागपूर ये‍थे केले. स्‍थानिक सिविल लाईन्‍स स्थित इंडियन बँकेच्‍या क्षेत्रीय कार्यालयाचे उद्घाटन आज त्‍यांच्‍या हस्‍ते झाले त्‍यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी इंडियन बँकेच्‍या व्‍यवस्‍थाप‍कीय संचालिका व मुख्‍य कार्यकारी अधिकारी पद्माजा चुंदरू, इंडियन बँकेचे क्षेत्रीय महाप्रबंधक संदीप कुमार गुप्‍ता प्रामुख्‍याने उपस्थित होते.

आंतरराष्‍ट्रीय विमानतळ, मेट्रो, मिहान, आय.टी.कंपन्‍या यामूळे औद्योगिक विकासात नागपूर अग्रेसर ठरत आहे. एच.सी.एल.या आय.टी.कंपनीतर्फे पुढील 3 वर्षात 10 हजार युवकांना रोजगार मिहान प्रकल्पात उपलब्ध होणार आहे. रोजगार निर्मिती सोबतच आर्थिक विकास दर वृद्धीमध्‍ये बँकींग़ क्षेत्राचेही भरीव योगदान आहे, असे ते यावेळी म्‍हणाले.

कापूस उत्‍पादक क्षेत्र असलेल्‍या विदर्भात सोलर चरख्‍यांच्‍या क्‍लस्‍टर निर्मितीच्‍या माध्‍यमातून सु‍तनिर्मिती व त्‍यांचे ब्लिचींग करून रेडीमेड गारमेंटचे निर्यात होईल, अशा पद्धतीने क्‍लस्‍टर निर्मिती होत आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

एम.एस.एम.ई. अंतर्गत कर्जमागणी 59 मिनिटात मंजुर करण्‍याच्‍या योजनेसंदर्भात त्‍यांनी सांगितले की या योजनेला जी.एस.टी. व आयकर प्रणाली सोबत जोडल्‍याने कर्जदारांची विश्‍वसनियता अधिक वाढली आहे. पण या योजनेअंर्गत त्‍वरित कर्ज मंजुरीसोबतच कर्जाचे वाटपही विलंब न करता बँकानी त्‍वरित करावे, अशी सूचना त्‍यांनी यावेळी केली.

इंडियन बँकेच्‍या माध्यमातून केंद्रीय जलशक्‍ती मंत्रालयाच्‍या ‘जल जीवन मिशन’ या अभियानाअंतर्गत ‘इंडियन बँक प्‍योर जल धारा’ हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमा अंतंर्गत झोपडपट्टी बहुल भागात जल-शुद्धीकरण व स्‍वच्‍छ पाण्‍याचा पुरवठा करणारे वाटर ए.टी.एम./आर.ओ.संयंत्र बसविण्यासाठी एम.एस.एम.ई. उद्योजक. स्वयं सहाय्यता गट यांना अर्थसहाय्य केले जाते. यामूळे पेयजल उपलब्‍धता व रोजगार निर्मिती हे दोन्‍ही उद्देश सफल होतात. या संयंत्राचे उद्घाटनही याप्रसंगी नागपूरात गडकरींच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

आज नागपूरात सुरू झालेले इंडियन बँकेचे हे 58 वे क्षेत्रीय कार्यालय आहे. इंडियन बँकेतर्फे ई-वाहनांच्‍या खरेदींना चालना मिळण्‍यासाठी सवलतीच्‍या व्याजदरात वेतनधारक ग्राहकांना कर्जवाटप करण्‍यात येत आहे, अशी माहिती बँकेच्‍या व्‍यवस्‍थाप‍कीय संचालिका व मुख्‍य कार्यकारी अधिकारी पद्माजा चुंदरू यांनी दिली.

याप्रसंगी ई-वाहन, मुद्रा योजना, आय. बी.-जलधारा योजना यांच्‍या कर्जाच्‍या मंजुरी पत्राचे वितरणही लाभार्थ्‍याना मंत्री महोदयांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या कार्यकमास इंडीयन बॅंकेचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.