Published On : Wed, Sep 11th, 2019

अनुपस्थितीत अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावा

गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती तारा (लक्ष्मी) यादव यांचे निर्देश

नागपूर : गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीच्या बैठकीमध्ये नागरिकांच्या हिताच्या महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. एकाच विषयाच्या अनुषंगाने दोनदा बैठक आयोजित करुनही अधिकारी अनुपस्थित असल्याने बैठकीमध्ये चर्चा होउ शकत नसल्याने अनुपस्थितीत अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावा, असे सक्त निर्देश गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती तारा (लक्ष्मी) यादव यांनी निगम सचिव हरीश दुबे यांना दिले.

बुधवारी (ता.११) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीच्या बैठकीमध्ये समिती सभापती तारा (लक्ष्मी) यादव यांच्यासह विशेष आमंत्रित सदस्य ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, समिती उपसभापती उभा पॅलट, सदस्य अनिल गेंडरे, परसराम मानवटकर, सदस्या रूतिका मसराम, निगम सचिव हरीश दुबे, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेंद्र रहाटे, सर्व झोनचे उपअभियंता उपस्थित होते.

गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीतर्फे रमाई घरकुल योजना, एस.आर.ए. बाबत, पंतप्रधान आवास योजना, पट्टे वाटप आदी विषयावर चर्चा करण्याच्या अनुषंगाने ४ सप्टेंबरला बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळीही अधिका-यांच्या अनुपस्थितीमुळे बैठक बुधवारी (ता.११) आयोजित करण्यात आली. मात्र या बैठकीतही अनेक अधिकारी अनुपस्थितीत राहिल्याने बैठकीत आवश्यक विषयांवर चर्चा होउ शकली नाही. यावर गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती तारा (लक्ष्मी) यादव यांनी नाराजी वर्तवित अनुपस्थितीत अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावणे व पुढील बैठकीत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.

यावेळी रमाई आवास योजनेंतर्गंत प्रलंबित प्रकरणे आठ दिवसाच्या आता पूर्ण न केल्यास संबंधित अधिका-यांवर कारवाई करण्याचेही निर्देश सभापतींनी दिले.