Published On : Wed, Sep 11th, 2019

आरोग्यपूर्ण वातावरण निर्मितीच्या दृष्टीने शहराचा विकास : महापौर नंदा जिचकार

‘मातृशक्ती ई-बस आगार व चार्जिंग स्टेशन’चे उद्घाटन

नागपूर : नागपूर शहरातील महिलांसाठी विशेष बस सेवा असावी या संकल्पनेतून आज शहरातील महिलांसाठी ‘तेजस्विनी बस’ सुरू करण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण या सर्वांसाठी विविध योजनांमार्फत कार्य केले जात आहे. संपूर्ण देशातील सार्वजनिक वाहतूक सेवा देणारी वाहने इलेक्ट्रिकवरील धुररहित असावित या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेची पूर्ती आज तेजस्विनी इलेक्ट्रिक बस व चार्जिंग स्टेशनच्या रुपाने होत आहे. पेट्रोल डिझेलचा वापर टाळून इलेक्ट्रिक वाहनांद्वारे आज आरोग्यपूर्ण वातावरण निर्मितीच्या दृष्टीने शहराच्या विकास होत आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २३ अंतर्गत लकडगंज स्माल फॅक्ट्री एरिया, पूर्व नागपूर येथे उभारण्यात आलेल्या ‘मातृशक्ती इलेक्ट्रिक बस आगार व चार्जिंग स्टेशन’चे बुधवारी (ता.११) पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते उद्घाटन तथा लोकार्पण झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरुन महापौर नंदा जिचकार बोलत होत्या.

मंचावर विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, सत्तापक्ष उपनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, परिवहन समिती सदस्या वैशाली रोहनकर, रुपाली ठाकुर, विशाखा बांते, सदस्य नितीन साठवणे, राजेश घोडपागे, उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक राजेश मोहिते आदी उपस्थित होते.

महिलांसाठीच्या विशेष तेजस्विनी बसची संकल्पना साकारण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी बस आगार व चार्जिंग स्टेशनच्या कार्याचे भूमिपूजन झाले. मंगळवारी (ता.१०) तेजस्विनी बसचे लोकार्पण झाले व आज महिलांच्या विशेष बस आगाराचे उद्घाटन व चार्जिंग स्टेशनचे लोकापर्ण होत आहे. ही गतीशील कार्याची ख-या अर्थाने प्रचिती आहे, अशा शब्दांमध्ये महापौर नंदा जिचकार यांनी परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांच्या कार्याचे कौतुक केले. शहरात विमानतळावर तसेच कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन आहेत. कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये सुमारे ६०० वाहने चार्ज करता येतील एवढ्या क्षमतेचे चार्जिंग स्टेशन आहेत. यामध्ये आता मातृशक्ती ई-बस आगारची भर पडली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या डिझेलमुक्त वाहनांच्या संकल्पनेला ही मोठी साथ असून लवकरच मनपातील वाहने सीएनजीवर परिवर्तीत करण्यात येणार असल्याचेही महापौरांनी यावेळी सांगितले.

मनपाच्या उत्पन्नवाढीच्या दृष्टीने उत्तम प्रकल्प : आमदार कृष्णा खोपडे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात शहरात इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आली आहे. दिवसेंदिवस वाढणा-या पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे मनपाच्या परिवहन विभागावर अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक बसचा आपली बसच्या ताफ्यात समावेश करण्यात आल्याने ई-बस संचालन व ई-चार्जिंग स्टेशन हा मनपाच्या दृष्टीने उत्तम प्रकल्प आहे, असे प्रतिपादन पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केले.

दिल्ली, मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये महिलांसाठी विशेष बस असून आता नागपूर शहरानेही महिलांसाठी विशेष बस सुरू केली हे अभिनंदनीय आहे. मनपाच्या परिवहन समितीतर्फे नेहमीच उत्तम कार्य करण्यात आले आहेत. बंडू राउत परिवहन समिती असताना त्यांनी परिवहन विभागाचे अनेक कार्य मार्गी लावले तर नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी आपल्या कार्यकाळात २३७ बसेस मनपाकडे हस्तांतरीत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. आता विद्यमान परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी इलेक्ट्रिक बस सेवेतून या कार्याला गती दिली आहे, असेही आमदार कृष्णा खोपडे म्हणाले.

यावेळी परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इलेक्ट्रिक बससाठी निधी उपलब्ध करुन दिला. मात्र हा निधी केवळ इलेक्ट्रिक बससाठीच नव्हे तर त्याचा उपयोग महिलांसाठी योग्यरित्या व्हावा या संकल्पनेतून महिलांसाठी तेजस्विनी विशेष बस सुरू होत आहे. दिल्ली, मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये महिलांसाठी विशेष परिवहन बस सेवा सुरू आहे. नागपूर महानगरपालिका महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव अग्रेसर आहे त्यामुळे मनपातर्फे महिलांसाठी विशेष बस सेवा तेजस्विनीच्या रुपाने सुरू होत आहे. मात्र या बससेवेसह या विशेष बससाठी वेगळे महिलांद्वारा संचालित विशेष बस आगार असावे या संकल्पनेतून ‘मातृशक्ती बस आगार व चार्जिंग स्टेशन’ उभारण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक राजेश मोहिते यांनी प्रकल्पाची माहिती दिली. तत्पुर्वी ‘मातृशक्ती बस आगार’चे कंत्राटदार आनंद पाचपोर, ओलेक्ट्रा या तेजस्विनी बस तयार करणा-या कंपनीचे पी.रेड्डी व तेजस्विनी बसचे परिचलन करणा-या हंसा ट्रॅव्हल्सचे श्री. पारेख यांचा महापौर नंदा जिचकार, आमदार कृष्णा खोपडे, परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे व अन्य मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन परिवहन विभागाचे अरुण पिपरूडे यांनी केले तर आभार परिवहन समितीचे सदस्य राजेश घोडपागे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे, वाहतूक व्यवस्थापक सुकीर सोनटक्के, विनय भारद्वाज, सतीश सदावर्ते, समीर परमार, प्रभव बोकारे यांच्यासह परिवहन विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी सहकार्य केले.

तेजस्विनी बसचे वेळापत्रक सोबत पाठवित आहे. कृपया दखल घ्यावी.