Published On : Wed, Mar 18th, 2020

जलप्रदाय विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावा

महापौर संदीप जोशी यांचे निर्देश : प्रभाग क्रमांक २६ (अ)च्या विकास कामांचा आढावा

नागपूर: शहरातील एका प्रभागाच्या विकास कामाच्या आढावा बैठकीचे नोटीस प्राप्त होउनही बैठकीला हजर न राहाणे व बैठकीच्या वेळी फोन न उचलून महापौरांच्या बैठकीकडे करण्यात आलेले दुर्लक्ष मनपाच्या जलप्रदाय विभाग अधीक्षक अभियंत्यांना चांगलेच भोवले आहे. याप्रकरणी संबंधित अधीक्षक अभियंत्यांना महापौरांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रभाग क्रमांक २६ (अ)च्या विकास कार्याचा व खर्चित-अखर्चित राशीचा आढावा घेण्यासंबंधी महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत विधी समिती सभापती तथा प्रभाग क्रमांक २६(अ)चे नगरसेवक ॲड.धर्मपाल मेश्राम यांच्या सुचनेनुसार बुधवारी (ता.१८) बैठक घेण्यात आली. महापौर कक्षामध्ये आयोजित बैठकीत विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम, उपायुक्त तथा आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता अमीन अख्तर, नेहरूनगर झोनच्या सहायक आयुक्त स्नेहा करपे, कनिष्ठ अभियंता राजेंद्र जिवतोडे, भांडेवाडी डम्पिंग यार्डचे झोनल अधिकारी श्री.राठोड आदी उपस्थित होते.

सदर बैठकीसंदर्भात मंगळवारी (ता.१७) जलप्रदाय विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांना पत्र पाठविण्यात आले होते. विभागाकडून पत्र मिळाल्याची पोचपावतीही देण्यात आली. मात्र बैठकीला अधीक्षक अभियंता उपस्थित झाल्या नाहीत. त्यांना बैठकीची माहिती देण्याकरीता फोनवरून संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सदर प्रकार विधी समिती सभापती व प्रभाग क्रमांक २६ (अ)चे नगरसेवक ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी महापौरांच्या लक्षात आणून दिली. याप्रकरणी जलप्रदाय विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

दोन दिवसात तपशीलवार माहिती सादर करा
प्रभाग क्रमांक २६ (अ)च्या विकास कार्याचा व खर्चित-अखर्चित निधीसंदर्भात महापौरांनी आढावा घेतला. सदर प्रभागात करण्यात आलेल्या कामाचे नाव व स्वरूप, कंत्राटदाराचे नाव, कार्याची किंमत, आर्थिक वर्ष, भूगतान दिले की कसे व केव्‍हा दिले, कोणत्या पदाअंतर्गत कार्य केले याची संपूर्ण तपशीलवार माहिती येत्या दोन कार्यालयीन दिवसात सादर करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले. याशिवाय भांडेवाडी कंपोस्ट डेपो येथील सुरक्षा भिंत व मागील ३ वर्षात करण्यात आलेल्या अंतर्गत कामांचीही कामाचे नाव व स्वरूप, कंत्राटदाराचे नाव, कार्याची किंमत, आर्थिक वर्ष, भूगतान दिले की कसे व केव्‍हा दिले, कोणत्या पदाअंतर्गत कार्य केले याची संपूर्ण तपशीलवार माहितीही दोन कार्यालयीन दिवसात सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.