Published On : Fri, Jun 11th, 2021

धक्कादायक! अल्पवयीन मुलाची अपहरणानंतर हत्या, खंडणीसाठी मागितलं काकाचं शिर कारण…

नागपूर : नागपुरातील अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज पांडे या 15 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. आरोपीनं हत्या करून रिंगरोड परिसरात राज याचा मृतदेह फेकला आहे. आरोपीने मुलाच्या खंडणीसाठी एका व्यक्तीच्या मुंडक्याची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न झाल्याने आरोपीने राज पांडेची हत्या केली आहे.

नागपूरच्या MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरामाता नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सुरज शाहू असं आरोपीचं नाव आहे. अपहरणकर्त्याने खंडणीकरता मुलाच्या काकाचे शीर मागितले होते. राज पांडेच्या पालकाकडे अशी मागणी फोनवर केली होती. यानंतर काकाच्या मुंडक्याचा फोटो व्हॉट्सऍपवर द्या आणि मुलाला सोडवा अशी अजब मागणी अपहरणकर्त्याने केली होती. सध्या आरोपी सुरज शाहू एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात आहे. पुढील तपास सुरू आहे.

MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतून क्रिकेट खेळायला गेलेल्या राजचे दुचाकीस्वाराने गुरूवारी सायंकाळी 6 च्या सुमारास अपहरण केले. मुलगा घरी परतला नाही म्हणून घरची मंडळी काळजीत होते. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांकडून युवकाचा तपास सुरू होता.

याचवेळी अपहरणकर्त्याचा राज पांडेच्या पालकांना फोन आला. ‘तुमच्या मुलाचे अपहरण करण्यात आले असून त्याची सुखरूप सुटका करायची असेल तर अमुक एका व्यक्तीचे शीर आणून द्या’, या मागणीमुळे पालकांसह पोलीसही चक्रावले होते. सुरजनं गुरुवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास राज याचं अपहरण केलं होतं. खंडणी म्हणून आरोपीनं मृत राज याच्या काकांच्या मुंडक्याची धक्कादायक मागणी केली होती. मागणी पूर्ण न झाल्यानं आरोपीनं मुलाची हत्या करुन मृतदेह रिंगरोड परिसरात फेकून दिला होता. पोलीस या हत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत.मात्र ताब्यात घेतलेल्या आरोपीच्या चेहऱ्यावर या घटनेची कोणताच परिणाम दिसत नाही.