Published On : Fri, Jun 2nd, 2023

नागपुरात धक्कादायक प्रकार उघड ; कैदी आणि पोलिसाने केली दारू पार्टी !

Advertisement

नागपूर : शहरात कैदी आणि पोलिसामध्ये घडलेला धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मेडिकलमध्ये उपचारासाठी आलेला एक कैदी एमआरआय काढण्यासाठी पोलिसांसोबत बाहेर गेला. परंतु पाच तासांनी दारू पार्टीकरूनच परतल्याची धक्कादायक तक्रार वैद्यकीय अधिक्षक कार्यालयात आली.

मेडिकलच्या वार्ड क्रमांक ३६ मध्ये ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारीनुसार, २३ वर्षीय कैदी चंद्रपूरचा रहिवासी असून ० मे रोजी मध्यरात्री १२.५ मिनिटांनी त्याला मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी चंद्रपूर येथील दोन पोलिस आले होते. दुसऱ्या दिवशी सायंकाळी एमआरआय काढण्यासाठी कैदीसोबत जात असल्याचे सांगून पोलिस निघाले. पाच तास उलटून गेल्यानंतरही कैदी आणि पोलिस परत आले नाही. यामुळे वॉर्ड क्रमांक ३६ मध्ये गोंधळ उडाला.

या प्रकारासंदर्भात वॉर्डातील इनचार्ज सीस्टरने मुख्य वैद्यकीय अधिकारी यांना माहिती दिली. त्यानंतर मेडिकलने कैदी निघून गेल्याची नोंद केली.परंतु पाच तासांनी पोलीस- कैदी ओली पार्टी करूनच वॉर्डात परतले. सदर माहिती वैद्यकीय अधिक्षक कार्यालयातून पोलिसांनाही देण्यात आली. यासंदर्भात मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार प्रतिक्रिया दिली. पोलीस कर्मचारी वार्डात दाखल कैद्याला एमआरआय काढण्याच्या नावावर घेऊन गेला. वॉर्डात हा कैदी बराच वेळ न दिसल्यामुळे विचारणा केली, तशी परिचारिकांनी नोंद केली. पार्टी करूनच कैदी आणि पोलिस परतले. हा प्रकार निंदनीय असून कैद्यांवर पाळत ठेवण्यासाठी पोलिस आहे की पार्ट्या कारण्यासाठी याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.