नागपूर: नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (GMCH) समोर आलेली एक धक्कादायक आकडेवारी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मागील सव्वा वर्षाच्या काळात येथे तब्बल 124 अविवाहित महिलांनी बाळांना जन्म दिला आहे. या आकड्यांमधून स्पष्ट होते की समाजात अल्पवयीन आणि अविवाहित गर्भधारणेचे प्रमाण चिंताजनक वेगाने वाढत आहे.
वयाअनुसार आकडेवारी-
18 वर्षांखालील अविवाहित मातांचे प्रमाण – 67
19 ते 21 वयोगट – 30 प्रकरणे
22 ते 25 वयोगट – 21 प्रकरणे
26 वर्षांवरील प्रकरणे – 6
GMCH चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले की, ही समस्या केवळ ग्रामीण भागापुरती किंवा गरीब वर्गापुरती मर्यादित नसून, समाजातील सर्व स्तरांमध्ये दिसून येते. “खासगी रुग्णालयांत जाऊन उपचार घेणाऱ्या उच्चवर्गीय महिलांचे आकडे आपल्यासमोर येत नाहीत, त्यामुळे खरी परिस्थिती आणखी गंभीर असण्याची शक्यता आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
वैद्यकीय आणि सामाजिक आव्हाने-
अल्पवयीन मुलींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर या गर्भधारणेचा खोल परिणाम होतो. या वयातील मुली गरोदर राहिल्यास त्यांच्या आरोग्याबरोबरच बाळाच्या आयुष्यावरही गंभीर परिणाम होतो. डॉक्टरांना फक्त उपचारच नव्हे तर कुटुंबातील सदस्यांची समुपदेशन करणे आणि योग्य मार्गदर्शन करणे देखील भाग पडते.
आरोग्यावर झालेले परिणाम (GMCH) अहवालानुसार-
54% बाळे कमी वजनाची जन्माला आली (Low Birth Weight)
16% प्रकरणांत गर्भपात
17% बाळे सामान्य वजनापेक्षा कमी
डॉ. गावंडे यांचा इशारा व उपाययोजना-
या विषयावर समाजात उघडपणे चर्चा होणे गरजेचे आहे. किशोरवयीन मुलींना लैंगिक शिक्षण आणि सुरक्षिततेबाबत योग्य माहिती मिळाली पाहिजे. पालक आणि मुलांमध्ये विश्वासाचे आणि संवादाचे नाते निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. ही समस्या केवळ आरोग्याशी निगडीत नाही, तर ती संस्कृती, शिक्षण, जबाबदारी आणि समाजाच्या मानसिकतेचा आरसा आहे.
दरम्यान 124 आकड्यांमागे असलेले वास्तव केवळ एक सामाजिक समस्या नसून, ते एक गभीर आरोग्य, शैक्षणिक आणि मानसिक आराखडा उभा करते. आजच समाजाला जागृत होण्याची आणि या विषयावर गांभीर्याने पावले उचलण्याची गरज आहे.