
नाशिक – राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. युती–आघाड्यांच्या चर्चांबरोबरच पक्षांतराची लाटही जोर धरू लागली आहे. सत्ताधारी महायुतीकडे नेते आणि कार्यकर्त्यांचा ओघ वाढत असतानाच, उद्धव ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा राजकीय धक्का बसला आहे.
नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतिन वाघ हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काँग्रेसचे दिग्गज नेते शाहू खैरे हेही भाजपाच्या वाटेवर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार असल्याची शक्यता आहे.
विनायक पांडे हे ठाकरे गटाच्या शिवसेनेतील नाशिकमधील अत्यंत वरिष्ठ व प्रभावी नेते मानले जातात. त्यांनी तब्बल ४३ वर्षे शिवसेनेत काम केल्यानंतर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने हा धक्का अधिक तीव्र मानला जात आहे. पांडे यांनी आपल्या नाराजीची कारणे उघडपणे मांडली आहेत.
“मी गेली ४३ वर्षे शिवसेनेत प्रामाणिकपणे काम केलं. मागच्या निवडणुकीत माझ्या मुलाचं तिकीट कापण्यात आलं, आता पुन्हा तीच परिस्थिती आहे. संजय राऊत यांच्याशी चर्चा केली, माझा मुलगा इच्छुक आहे, मात्र अजून कोणताही स्पष्ट प्रतिसाद मिळालेला नाही,” असे पांडे यांनी सांगितले.
‘विकासासाठी भाजप हाच पर्याय’
“इतक्या वरिष्ठ नेत्याला अशी वागणूक मिळत असेल तर पक्षात राहण्याचा अर्थ काय? शिवसेना सोडताना नक्कीच दुःख होत आहे, पण विकास करायचा असेल तर भाजपमध्ये जाऊनच तो शक्य आहे. भाजपकडून तिकीट मिळेल, आमचा संपूर्ण पॅनल प्रवेश करणार आहे,” असे स्पष्ट मत विनायक पांडे यांनी व्यक्त केले.
उद्धव ठाकरे यांच्याविषयी नाराजी नसल्याचे सांगत, “मागील निवडणुकीत माझ्यावर अन्याय झाला आणि त्यानंतर परिस्थिती हाणामारीपर्यंत गेली,” असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
नाशिकमध्ये एकाच वेळी शिवसेना (उद्धव गट) आणि काँग्रेसला धक्का देत भाजप आपली ताकद वाढवत असल्याचे चित्र आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पक्षांतर राज्याच्या राजकारणात मोठे परिणाम घडवू शकते.








