
नागपूर – नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभवानंतर आता शिंदेसेनेचे नागपूर जिल्हा उपप्रमुख वर्धराज पिल्ले यांनी थेट निवडणूक प्रक्रियेवरच गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पक्षाच्या आढावा बैठकीत बोलताना पिल्लेंनी संपूर्ण निवडणूक यंत्रणेलाच कटघऱ्यात उभं करत, हे निकाल नैसर्गिक नसून ‘सिस्टम सेट’चा परिणाम असल्याचा आरोप केला आहे.
राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिंदेसेनेचे नागपूर जिल्हा उपप्रमुख वर्धराज पिल्ले यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक हरल्यानंतर निवडणूक आयोग आणि एकूणच निवडणूक व्यवस्थेवर गंभीर आरोपांची तोफ डागली. “महाराष्ट्रभर जे निकाल समोर आले आहेत, ते लोकशाही प्रक्रियेतून आलेले नाहीत, तर आधीपासून ठरवलेल्या यंत्रणेचा भाग आहेत,” असा दावा त्यांनी केला.
भंडारा नगरपरिषद निवडणुकीचे उदाहरण देत पिल्ले म्हणाले की, तेथे ईव्हीएमच्या बॅलेट युनिटवर उमेदवाराचं नावच गायब होतं. ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक असून, निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असे त्यांनी नमूद केले.
यासोबतच विदर्भासह महाराष्ट्रातील अनेक मतदान केंद्रांवर ओळखपत्रांशिवाय निवडणूक अधिकारी उपस्थित असल्याचा आरोपही पिल्लेंनी केला. अशा गंभीर त्रुटी आणि अनियमिततेमुळेच शिंदेसेनेला निवडणुकीत नुकसान सहन करावं लागलं असून, याचा थेट परिणाम संपूर्ण राज्यातील निवडणूक निकालांवर झाल्याचा दावा त्यांनी केला.
नगरपरिषद निवडणुकांनंतर शिंदेसेनेकडून उघडपणे निवडणूक व्यवस्थेवर आरोप होऊ लागल्याने, येत्या काळात या प्रकरणावर राजकीय वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.








