Published On : Wed, Jul 4th, 2018

अखेर विधानपरिषदेसाठी शिवसेना मंत्री दीपक सावंत यांचा पत्ता कट

नागपूर : अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डॉ. दीपक सावंत यांचा पत्ता कट केला असून, त्यामुळे सावंत चांगलेच नाराज असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या तिकिटावर डॉ.दिपक सावंत हे दोनदा मुंबई पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेवर आमदार आहेत. मात्र त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह, नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी वाढल्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांचा पत्ता कट करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी येत्या १६ तारखेला निवडणूक संपन्न होणार असून, सर्वच प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे अनिल परब आणि मनीषा कायंदे यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षप्रमुख सावंतांवर चांगलेच नाराज असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

जून महिन्यात विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघातून शिवसेनेने आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत यांना उमेदवारी न देता प्रभाग क्र.४ चे पदाधिकारी विलास पोतनीस यांना उमेदवारीदेण्यात आली होती. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबण्यास सांगितले होते. त्यामुळे आता दीपक सावंत कुठली भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे.