| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Sep 16th, 2017

  शिवाजी शिक्षण संस्थेने गुणवत्तापुर्ण शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  · श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवाचा समारोप
  · शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन


  नागपूर: उत्तम मनुष्यबळाची निर्मिती करणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय्य समोर ठेऊन श्री शिवाजी शिक्षण संस्थेने गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले असल्याचा गौरवपुर्ण उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संस्थेच्या सुवर्ण महोत्सवाच्या समारोप समारंभ प्रसंगी केला.

  श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या विज्ञान महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन, सुवर्ण महोत्सवाचा समारोप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी केंद्रीय परिवहन व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, महापौर सौ. नंदा जिचकार, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार रणधीर सावरकर, अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख व अन्य मान्यवर पदाधिकारी, प्राचार्य डॉ.देवेंद्र बुरघाटे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव विशेषांक तसेच वार्षिक विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विदर्भात श्री शिवाजी शिक्षण संस्थेने सर्वसामान्यापर्यत शिक्षण पोहोचवले आहे. ही संस्था समाजाची आहे. संस्थेचे सायन्स कॉलेज विदर्भातील प्रतिथयश महाविद्यालय आहे.

  श्री शिवाजी शिक्षण संस्था मानांकनानुसार स्वायत्ततेकडे वाटचाल करीत आहे. ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. कारण शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेसाठी स्वायत्तता असणे गरजेचे असते. महाविद्यालयांना गुणवत्तेनुसार मानांकन देऊन स्वायत्तता दिल्याने संशोधन क्षेत्रालाही चालना मिळणार आहे. उत्तम मनुष्यबळाची निर्मिती करणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय्य असले पाहिजे. शिक्षणात सातत्याने गुणवत्ता राखणे महत्वाचे आहे.


  माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञान आणि गुणवत्ता हेच महत्वपूर्ण भांडवल असून याआधारेच उत्तम मनुष्यबळाची निर्मिती केल्यास जागतिक महासत्ता बनण्याचे आपले स्वप्न नक्कीच साकार होईल. उत्तम गुणवत्तेच्या आधारावरच उत्तम मनुष्यबळ निर्मिती करता येईल व याद्वारे देशाच्या विकास प्रक्रियेलाही चालना मिळेल. देशाच्या लोकसंख्येतील मोठी संख्या तरुणांची असून उत्तम मनुष्यबळ निर्मितीसाठी ही आपल्यासाठी संधी असल्याचेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

  केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, शिवाजी सायन्स महाविद्यालयाने शिक्षण क्षेत्रात सातत्याने गुणवत्ता राखली आहे. संस्थेने विदर्भात शिक्षणाचे जाळे पसरवून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचविले. ही बाब नक्कीच उल्लेखनीय असल्याचेही श्री. गडकरी यांनी सांगितले.


  प्राचार्य डॉ. देवेंद्र बुरघाटे म्हणाले, शिवाजी सायन्स महाविद्यालय विविध आघाड्यांवर अग्रेसर आहे. महाविद्यालयास नॅक मानांकनात ए प्लस प्राप्त आहे. संस्थेत माणूस घडविण्यावर भर देण्यात येत आहे. महाविद्यालयात विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत असून महाविद्यालयाने अनेक नामांकित विद्यापीठाशी सामंजस्य करार केले आहे. महाविद्यालयाला लवकरच मानांकनानुसार स्वायत्त दर्जा मिळणार असल्याचेही प्राचार्य बुरघाटे यांनी सांगितले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145