Published On : Sat, Sep 16th, 2017

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक निधी – मुख्यमंत्री


नागपूर:
कौशल्यप्राप्त तरुणांना संपूर्ण जगात मागणी असून केंद्र व राज्य सरकारने कौशल्य विकास कार्यक्रमांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना सहाशे पेक्षा जास्त अभ्यासक्रमात 50 टक्के फी माफीची योजना राबवित असून या योजनेत 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांना 280 कोटी रुपयाचे वाटप केले असून गेल्या 9 वर्षात या योजनेत सर्वात जास्त निधी दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले.

मेहमुदा शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित कमवा आणि शिका कार्यक्रमाअंतर्गत धनादेश वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. महापौर नंदा जिचकार, खासदार अजय संचेती व माजी मंत्री अनिस अहमद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अल्पसंख्यांक मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत अंजूमन महाविद्यालयातील 700 विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी 31 लाख 50 हजार रुपये शिष्यवृत्ती धनादेश वितरण कार्यक्रम आज मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.

युवकांपर्यंत कौशल्य पोहचविणे आवश्यक असून कौशल्यप्राप्त युवक देशाच्या अर्थव्यवस्थेत व प्रगतीत योगदान देऊ शकतो असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने कौशल्य विकासावर अधिक भर दिला असून या बाबीचा देशाच्या प्रगतीत महत्वाचा वाटा असणार आहे. सबका साथ सबका विकास या धोरणानुसार राज्य शासनाने अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी अनेक योजना आखल्या आहेत. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांची 600 पेक्षा जास्त अभ्यासक्रमात 50 टक्के फी शासन भरते. या योजनेचा 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांना लाभ झाल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेचा गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मेहमुदा शिक्षण संस्था कौशल्य विकास कार्यक्रमात चांगले काम करीत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शासन मेहमुदा शिक्षण संस्थेला सर्वोतोपरी सहकार्य करेल. बुनियादी शिक्षण पद्धतीत बदल करण्याचा शासनाचा विचार असून अधिक रोजगाराभिमूख शिक्षण पद्धती निर्माण करण्यावर भर देण्यात येईल. यावेळी मुख्यमंत्री यांनी कौशल्य विकास प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच विविध क्षेत्रातील कार्यासाठी पारितोषिक मिळालेल्या व्यक्तींचे अभिनंदन केले.


कमवा आणि शिका योजनेअंतर्गत 700 विद्यार्थ्यांना 31 लाख 50 हजार रुपये शिष्यवृत्ती धनादेशाची वितरण यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. या मुलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी इंडियन मुस्लिम चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि मेहमुदा शिक्षण संस्था यांच्यात मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री यांच्या हस्ते विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यात सुनील रायसोनी, राजश्री जिचकार, राहुल पांडे, आसपाक अहमद, आनंद संचेती, पुरुषोत्तम मालू, स्वप्नील अग्रवाल, डॉ. मुकेश आणि प्रेमल चांडक, शशी थापर, संजय देशपांडे, अतुल कोटेचा, डॉ. राजन व डॉ. बाबर यांचा समावेश आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असल्याचे माजी मंत्री अनिस अहमद यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगती पथावर असून नागपूर शहराचा कायाकल्प मुख्यमंत्री यांनी केला आहे. मुख्यमंत्री अभ्यासू व उत्तम वक्ते असल्याचे त्यांनी सांगितले. अंजूमन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रीक ऑटोरिक्षा तयार केल्याची माहिती त्यांनी दिली. खासदार अजय संचेती यांचे यावेळी भाषण झाले.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. अब्दूल आहत यांनी केले. तर आभार डॉ. बाबर यांनी मानले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement