
नागपूर : नागपूर शहरात स्मार्ट वीज मीटर बसविल्यानंतर वाढीव वीज बिले, तांत्रिक अडचणी आणि ग्राहकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याची मागणी केली आहे. यासाठी शिवसेना नागपूर लोकसभा तर्फे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक सूरज गोजे यांच्या नेतृत्वाखाली गड्डीगोदाम चौक येथील महावितरण कार्यालयात अधीक्षक अभियंता लांडे यांना निवेदन देण्यात आले. नागपुरात यापूर्वीही विविध संघटना आणि नागरिकांनी स्मार्ट मीटर बसविण्याबाबत आंदोलन करत विरोध नोंदवला आहे.
निवेदनात स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांच्या वीज बिलात अनपेक्षित वाढ झाल्याच्या तक्रारी येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच मीटरच्या अचूकतेबाबत शंका, तांत्रिक अडचणी आणि पुरेशी जनजागृती न करता मीटर बसविण्याचा प्रयत्न होत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
शिवसेनेने महावितरणकडे स्मार्ट मीटरविषयी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याची, प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची निष्पक्ष चौकशी होईपर्यंत मीटर बसविण्याची प्रक्रिया स्थगित ठेवण्याची तसेच वाढीव वीज बिलांच्या तक्रारींची स्वतंत्र तांत्रिक समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली.
याशिवाय, मीटरच्या अचूकतेबाबत शंका असलेल्या ग्राहकांचे मीटर शासनमान्य प्रयोगशाळेत तपासून त्याचा अहवाल संबंधित ग्राहकांना देण्यात यावा, ग्राहकांची पूर्वसंमती घेतल्यानंतरच स्मार्ट मीटर बसविण्यात यावेत आणि प्रत्येक विभागात विशेष तक्रार निवारण शिबिरे आयोजित करून नागरिकांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करावे, अशी मागणीही करण्यात आली.
चौकशी पूर्ण होईपर्यंत स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिल आल्याचा दावा करणाऱ्या ग्राहकांवर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये किंवा त्यांचा वीजपुरवठा खंडित करू नये, अशी भूमिकाही शिवसेनेने निवेदनातून मांडली.
यावेळी अधीक्षक अभियंता लांडे यांनी नागरिकांमधील गैरसमज दूर करण्यासाठी शहरातील विविध भागांत दर आठवड्याला जनजागृती मोहीम राबविण्यात येईल. जुने आणि स्मार्ट मीटर यातील फरक प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितला जाईल तसेच प्रलंबित तक्रारींचेही विशेष मोहिमेद्वारे निराकरण करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे शिवसेनेने सांगितले.
दरम्यान, नागरिकांच्या हिताच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.




