
मुंबई– काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डची महत्त्वाची बैठक होणार असून, राज्यातील सर्व नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. एकूण २९ नगरपालिकांच्या निवडणुका असल्याने कोणत्या ठिकाणी आघाडीसोबत निवडणूक लढवायची, यावरही बैठकीत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भाजपवर जोरदार टीका करताना वडेट्टीवार म्हणाले की, भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे. त्यांना हिंदू-मुस्लिम असा कोणताही विषय नाही; सत्ताच त्यांचा एकमेव अजेंडा आहे. द्वेष पसरवून मते मिळवणे आणि राजकारणातून समाजात विष पेरणे, हीच भाजपची कार्यपद्धती असल्याचा आरोप त्यांनी केला.
नगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारांची निवड करताना संबंधित परिसरातील लोकप्रियता, सामाजिक कार्यातील सहभाग आणि पक्षाशी असलेली निष्ठा या सर्व निकषांचा विचार केला जाईल, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. इच्छुक उमेदवारांकडून मिळणाऱ्या मोठ्या प्रतिसादामुळे काँग्रेसकडे जनतेचा वाढता कल दिसून येत आहे. पुढील दोन दिवसांत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.








