Published On : Fri, Aug 9th, 2019

शेतीपूरक लघुउद्योगांद्वारे आदिवासींनी आर्थिक विकास साधावा – केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी

नागपूर : शेतकऱ्यांसाठी बांबू, मशरुम, मध संकलन तसेच जैव इंधनासाठी अखाद्य तेलबियांचे उत्पादन घेणे यासारखे शेतीपूरक लघुउद्योग यापुढील काळात अत्यंत किफायतशीर ठरणार असून आदिवासी बांधवांनी स्वयंरोजगार व कौशल्य विकासाची कास धरुन शेतीपुरक लघु उद्योगांद्वारे आपला आर्थिक विकास साधावा, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभागाच्या वतीने कविवर्य सुरेश भट सभागृह येथे राज्यस्तरीय गौरव सोहळयाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उइके, आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, महापौर नंदा जिचकार, आमदार डॉ. मिलिंद माने, राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या सदस्या मायाताई इवनाते, प्रधान सचिव मनिषा वर्मा, आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, अपर आयुक्त डॉ. संदीप राठोड, आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. पाटील तसेच विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी बांधवांच्या कल्याणाकरिता विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. देशातही 150 मागास जिल्हयांमध्ये विविध विकासकामे प्रगतीपथावर असून यामध्ये आदिवासीबहुल जिल्हयांचा प्रामुख्याने समावेश आहे. आदिवासी बांधवांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासावर भर देवून त्यांचा सर्वांगिण विकास साधण्यात येत आहे. खादी आणि ग्रामोद्योगाच्या माध्यमातून मध संकलनासाठी मध पेट्यांकरिता शंभर कोटी रुपयांचे भरीव अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले आहे. आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांना जैव इधनासाठी अखादय तेलबियांचे उत्पन्न घेणे यापुढे निश्चितच किफायतशीर ठरणार आहे. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल. आदिवासी विद्यार्थ्यांनी आता रोजगाराभिमुख शिक्षणाकडे वळवून स्वयंरोजगार निर्माण करावा. आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांसाठी वाहनचालक प्रशिक्षणासारख्या योजनाही राबविण्यात येत आहेत. मिशन शौर्यअंतर्गत एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या आदिवासी युवकांचा गौरवही श्री. गडकरी यांनी केला.

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उइके म्हणाले, आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सुधारणेसाठी अनेक अभिनव योजना अत्यंत प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. आदिवासी विकासाकरिता विविध विभागांनाही भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. याअंतर्गत सर्व योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावा. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे महत्वाचे कार्य विभागामार्फत करण्यात येत आहे.

आदिवासी समाजाच्या इतिहासाचे समग्र संकलन व संग्रहण करण्यासाठी गडचिरोली येथे संग्रहालय उभारणे, तसेच आदिवासींसाठी नागपूर येथे प्रशिक्षण केंद्र व आदिवासी समाज संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी गोंडवाना संग्रहालय उभारण्यासंदर्भातील मनोदयही डॉ. उइके यांनी व्यक्त केला. लघु आणि मध्यम उद्योगांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या सर्वांगिण विकासावर भर देण्यात येणार असून आदिवासी विद्यार्थ्यांना नागरी सेवा परिक्षांकरिता मुख्य परिक्षा व मुलाखतीच्या तयारीसाठी सर्वंकक्ष मदत विभागामार्फत करण्यात येणार आहे. वाहनचालक प्रशिक्षणासारख्या रोजगाराभिमुख योजनाही राबविण्यात येत असल्याचे डॉ. उइके यांनी सांगितले.

आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके म्हणाले, आदिवासी बांधवांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे जतन केले आहे. आदिवासींमुळेच वनसंपदा टिकून आहे. वनहक्क व पेसाअंतर्गत अनेक व्यक्ती व संस्थांनी उल्लेखनिय कार्य करुन आदिवासींच्या हक्कांचे जतन केले आहे. आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेवून आदिवासी बांधवांनी आपला विकास साधावा. आदिवासी विद्यार्थ्यांमधील सिकलसेल व थॅलेसिमिया हे आजार रोखण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करण्यात येत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये सर्वच क्षेत्रात मोठी क्षमता आहे. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार मिळवून देण्यात येत आहे. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी प्रशिक्षण केंद्रेही कार्यरत आहेत. आदिवासी बांधवांना आवश्यक सेवासुविधांचा आढावा घेण्यासाठी लवकरच बेंचमार्क सर्व्हे करण्यात येणार असून यामुळे विविध योजना अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य होणार असल्याचेही डॉ. फुके यांनी सांगितले.

प्रास्ताविकात प्रधान सचिव मनिषा वर्मा म्हणाल्या, आदिवासी बांधवांचे कला-संस्कृती आणि वनसंपदेशी अत्यंत जवळचे नाते आहे. स्वातंत्र्यलढयातही आदिवासी बांधवांचे अत्यंत मोलाचे योगदान आहे. पेसा आणि वनहक्क कायद्याद्वारे आदिवासींच्या हक्कांची जपणूक करण्यात येत आहे. आदिवासी विकास विभागामार्फत विविध योजना प्रभावीपणे राबवून आदिवासी गावपाड्यांवर विज, रस्ते, पाणी, शिक्षण व रोजगार प्रामुख्याने पोहचविण्यावर भर देण्यात येत असल्याचे वर्मा यांनी सांगितले.

या कार्यक्रमामध्ये राज्यातील संस्थांना प्रोत्साहन व त्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने आदिवासी सेवक पुरस्कार व आदिवासी सेवा संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आले. 29 आदिवासी सेवक पुरस्कार व 9 आदिवासी सेवा संस्था यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. मिशन शौर्य-2 अंतर्गत माऊंट एवरेस्ट शिखर सर करण्याची कामगिरी करणाऱ्या 11 विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह गौरव करण्यात आला.

आदिवासी विकास विभागाअंतर्गत असलेल्या शासकीय, अनुदानित आदिवासी आश्रमशाळा, एकलव्य निवासी शाळा, नामांकित इंग्रजी माध्यम शाळा, तसेच इतर शाळेतील मार्च-2019 मध्ये झालेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परिक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या 154 विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचाही गौरव करण्यात आला.

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातील 56 अनुसूचित जमातीतील मान्यवरांना ‘महाराष्ट्र आदिवासी रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हस्तकला व चित्रकला या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 17 अनुसूचित जमातीतील मान्यवरांना ‘आदिवासी कलाकार पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. आश्रमशाळा कायापालट अभियानाअंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या एकूण 19 कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

सामुहिक, वैयक्तीक वनहक्क यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती तसेच पेसा क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती यांना गौरविण्यात आले. तसेच अटल आरोग्य वाहिनीमधील वैद्यकीय अधिकारी, आदिवासी बोली भाषेमध्ये पुस्तके भाषांतर करणारे शिक्षक यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.