Published On : Thu, Apr 16th, 2020

निवारा केंद्र ठरताहेत बेघरांच्या सक्षमतेचे केंद्र

Advertisement

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून बेघरांच्या आत्मनिर्भरतेसाठी अनेक उपक्रमांचे आयोजन : नवीन कपडे, दाढी आणि केश कापल्याने ‘मेक ओव्हर’

नागपूर : बेघरांच्या सुरक्षेच्यादृष्टीने मनपातर्फे सुरू करण्यात आलेले निवारा केंद्र आता बेघरांना सक्षम करण्याचे केंद्र ठरत आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून या निवारा केंद्रांमध्ये स्वच्छतेच्या काळजीसह बेघरांच्या आत्मनिर्भरतेसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शहरातील रस्ते, फुटपाथवर राहणा-या या बेघरांना सक्षम बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे लॉकडाउनचा अभिनव फायदा करून घेतला जात आहे.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शहरातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागातर्फे दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून मनपा आयुक्तांच्या पुढाकाराने नियमित निवाऱ्यासोबतच तात्पुरत्या शहरी बेघर निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या शहरातील विविध भागातील एकूण २० बेघर निवाऱ्यात १२५२ जणांनी आसरा घेतला असून मनपातर्फे चहा, नाश्ता व दोन वेळच्या संपूर्ण भोजनाचीही मोफत सोय तेथे करण्यात येत आहे. पोटाची भूक भागविताना या बेघरांच्या संपूर्ण सुरक्षेचीही पूर्णपणे काळजी घेतली जात आहे. पहिल्यांदा निवारा केंद्रामध्ये आलेल्या बेघरांची अवस्था केश वाढलेले, मळकट कपडे, मळलेले शरीर अशी होती. निवारा केंद्रामध्ये आणल्यानंतर त्यांचे केश कापण्यात आले, रोज आंघोळ करून स्वच्छ नवीन कपडे वापरायला दिले जात आहेत. अनेक स्वयंसेवी संस्थांकडून या बेघरांसाठी नवीन कपडे देण्यात आले आहेत. एकूणच मनपा आयुक्तांनी संकल्पना आणि स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकारातून या बेघरांचे पूर्णत: ‘मेक ओव्हर’ झाले आहे.

अन्न आणि स्वच्छतेसह या बेघरांच्या कौशल्यांकडेही विशेष लक्ष देण्यात येत आहे. रस्त्यावर राहणा-या बेघरांना आत्मनिर्भर करून लॉकडाउन नंतर त्यांना सक्षमतेने जीवन व्यतित करता यावे यासाठी त्यांच्यातील कौशल्य विकसीत केले जात आहे. या बेघरांना वेगवेगळ्या कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी सुतार कामाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचे फलित म्हणजे सर्व प्रशिक्षणार्थ्यांकडून सुंदर स्वरूपाचे पक्ष्यांचे घरटे तयार झाले. उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना दिलासा देण्या-यांमध्ये आता या बेघरांचेही हात पुढे आले आहेत. याशिवाय पाककलेच्या प्रशिक्षणात सर्वांनी जलेबी सुद्धा बनविली. विशेष म्हणजे या निवारा केंद्रांकरिता व तिथे राहणा-या बेघरांच्या सुविधा आणि प्रशिक्षणाकरिता अनेक स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. या स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकारातूनच हे सर्व कार्य सुरू आहे.

बेघरांचे सन्मानाने जगणे मान्य व्हावे
या सर्व उपक्रमाची माहिती देताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, लॉकडाउनमध्ये रस्त्यावर, फुटपाथवर राहणा-या बेघरांची दुरावस्था होउ नये याकरिता मनपाने त्यांची व्यवस्था निवारा केंद्रात केली. मात्र लॉकडाउन नंतरही या बेघरांनी रस्त्यावरच जीवन व्यतित करू नये. ते या समाजाचा एक भाग आहेत आणि त्यांनी आपले सामाजिक जीवन स्वीकार करावे व समाजानेही त्यांचे सन्मानाने जगणे मान्य करावे यासाठी मनपाने त्यांच्या कौशल्य विकासाचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यादृष्टीने या निवारा केंद्रातील नागरिकांमधील कौशल्य शोधून त्यांना त्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. सुतारकाम, बुट बनविणे, स्वयंपाक काम यासारख्या विविध कामांमध्ये रुची असणा-यांना त्यांच्या आवडीनुसार प्रशिक्षण देण्यात येते. जेणे करून पुढे हे नागरिक दुस-यांवर निर्भर न राहता ते स्वयंसक्षमतेने जीवन जगू शकतील, असेही त्यांनी सांगितले.


२० निवारा केंद्र
शहरात मनपाच्या समाजकल्याण विभागातर्फे संचालित करण्यात येणाऱ्या शहरी बेघर निवाऱ्यासोबतच एकूण २० शहरी बेघर निवाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सीताबर्डी येथील बुटी कन्या शाळा, पंडित रवीशंकर शुक्ला मनपा शाळा, टेकडी गणेश मंदिरासमोरील उड्डाणपुलाखालील गाळे, डिप्टी सिग्नल येथील साखरकर वाडीतील गुरु घासीदास समाज भवन, नारा इंदोरा परिसरातील मठमोहल्ला येथील वाचनालय व समाजभवन, हंसापुरी प्राथमिक माध्यमिक शाळा, रा.ब.गो.गो. मनपा शाळा सदर, कोराडी मार्गावरील तुली हॉस्टेल, रविनगर येथील अग्रसेन भवन, सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील अग्रसेन भवन चौकातील लोहाना महाजनवाडी, हिंगणा मार्गावरील एल्केम साऊथ एशिया प्रा.लि., सौराष्ट्र लेवा पटेल समाज रेवतीनगर, बेसा, सदर येथील शासकीय तंत्रनिकेतन वसतिगृह, बगडगंज येथील परमात्मा एक सेवक, हिवरी नगर येथल श्री लोहाना सेवा मंडळ, उमरेड मार्ग आवारी चौक येथील जैन कलार समाज सभागृह, मानेवाडा मार्गावरील सिद्धेश्वर सभागृह, कामठी मार्गावरील पीडब्ल्यूएस कॉलेज आणि दुर्गा माता मंदिर समाज भवन छावनी या २० ठिकाणी निवाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण निवारे मिळून एकूण १५९१ इतकी क्षमता आहे. यामध्ये सध्या १२५२ नागरिकांनी आसरा घेतला आहे. यामध्ये ११२१ पुरुष, ९५ महिला आणि ३६ बालकांचा समावेश आहे.

या संस्थांद्वारे निवारा केंद्राचे संचालन
या संपूर्ण शहरी बेघर निवाऱ्यांचे संचलन विविध सामाजिक संस्थांकडे देण्यात आले आहे. सह्याद्री ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, मनीषनगर, संस्कृती महिला व बालविकास बहुउद्देशीय संस्था मनीष नगर, सहारा बहुउद्देशीय संस्था, लिलाई बहुउद्देशीय संस्था प्रेम नगर, परमात्मा एक बहुउद्देशीय शिक्षण संस्था तांडापेठ, लाईव्हवेल संस्था मेडिकल चौक, धम्मदीप बहुउद्देशीय शिक्षण संस्था धंतोली, संतोषी बहुउद्देशीय जनकल्याण संस्था, हनुमाननगर, ऐश्वर्या बहुउद्देशीय संस्था, नेहरू नगर, कल्पना बहुउद्देशीय मंडळ आणि नीरजा पठानिया यांचा निवाऱ्यांचे संचलन करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींमध्ये समावेश आहे.

Advertisement
Advertisement