Published On : Thu, Apr 16th, 2020

परीट (धोबी) समाजाला शासनाने आर्थिक साहाय्य द्यावे बावनकुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे एका पत्रातून मागणी

Advertisement

नागपूर: राज्यात दीड लाखावर असलेल्या परीट (धोबी) समाज कोरोना लॉक डाऊनमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. या समाजाचा इस्त्रीचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प पडला आहे. या समाजाला शासनाने आर्थिक साहाय्य द्यावे, अशी मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका पत्रातून केली आहे.

संपूर्ण देशात कोरोनामुळे संचारबंदी असल्यामुळे या समाजातील लहान व मोठ्या व्यावसायिकांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. परिणामी या समाजाच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. या व्यावसायिकांना दुकानभाडे, घरभाडे, लाईट बिल भरणे कठीण झाले आहे. परीट समाज महासंघाचे एक शिष्टमंडळ मला भेटले असून त्यांनी मला एक निवेदन दिले आहे. त्यातून काही मागण्या त्यांनी केल्या आहेत.

परीट समाज व्यावसायिकांना 3 महिन्याचे वीज बिल माफ करावे, तीन महिन्याचे घर भाडे व दुकान भाडे माफ करावे, 3 महिन्यासाठी मासिक 5 हजार रुपये भत्ता देण्यात यावा तसेच व्यवसायासाठी 25 हजार रुपये बिनव्याजी कर्ज देण्यात यावे आशा मागण्या महासंघाकडून करण्यात आल्या आहेत. या समाजाच्या मागण्यांचा शासनाने सहानुभूतीने विचार करावा, अशी विनंती बावनकुळे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केली आहे.