Published On : Wed, Apr 15th, 2020

जीवनावश्यक वस्तू पुरवठा आराखडा तयार करा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

Advertisement

नागपूर, : ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत 3 मे पर्यंत वाढला असून येणारे दिवस जिकिरीचे आहेत. नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंचा नियमित पुरवठा व्हावा तसेच विस्थापित बेघर व मजूर व्यक्तींच्या निवासाची तसेच भोजनाची व्यवस्था व्हावी यादृष्टीने प्रशासनांने आराखडा तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले. किराणा, भाजीपाला, दूध, औषधी, आरोग्य सेवा व कम्युनिटी किचन या बाबींचा आराखड्यात प्राधान्याने समावेश असावा, असे त्यांनी सांगितले.

‘लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज पालकमंत्री यांनी विविध विषयाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अप्पर पोलिस आयुक्त निलेश भरणे, पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Gold Rate
27 June 2025
Gold 24 KT 96,400 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver/Kg 1,07,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, वैद्यकीय सुविधा, गृह व संस्थात्मक विलगीकरण, अलगीकरण, किराणा, दूध व भाजीपाला वितरण, निवारा गृह, धान्य वाटप व कायदा व सुव्यवस्था आदी विषयाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. ‘लॉकडाऊन’चा कालावधी वाढल्यामुळे नागरिकांची जीवनावश्यक वस्तूंची मागणी वाढणार आहे. या परिस्थितीत प्रशासनाने जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करुन देण्यासाठी तात्काळ नियोजन करावे. कॉटन मार्केट आणि कळमना मार्केट याठिकाणी भाजीपाला विक्री पूर्ण बंद असणार आहे. मात्र कांदा, बटाटा, लसूण व मिरचीची विक्री चालू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. महात्मा फुले भाजी बाजार याठिकाणी मोजक्या प्रमाणात खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु ठेवण्याबाबत नियोजन करता येईल का, याची चाचपणी करण्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे पण रेशनकार्ड नाही तसेच ज्यांच्याकडे रेशनकार्ड व आधारकार्डही नाही अशा नागरिकांना किराणा धान्य कीट देण्याबाबत नियोजन करण्यात यावे.

ग्रामीण भागात किराणा धान्य कीट वाटपाचे काम योग्य पद्धतीने सुरु असून शहरात वाटपाचे नियोजन आवश्यक असल्याचे राऊत म्हणाले. लॉकडाऊन वाढल्यामुळे नागरिकांची आर्थिक अडचण वाढणार आहे. ही बाब लक्षात घेता येणाऱ्या काळात भोजनाची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहे.

यासाठी कम्युनिटी किचन बाबतचा आराखडा तयार करावा, निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे ते म्हणाले. नागरिकांना लागणारे भोजन स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून वितरीत करण्याचे नियोजन करावे. विश्वासार्ह संस्थेची निवड करुन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात यावी. सामाजिक संस्थांना यासाठी निधी देण्यात येईल. यावर पोलिस विभागाने नियंत्रण ठेवावे, असे पालकमंत्री म्हणाले.

कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय साधनं घेण्यासाठी आमदार निधीमधून प्रत्येकी 50 लाख निधी घेणेबाबत सर्व आमदारांना पत्र लिहावे असे पालकमंत्री यांनी सांगितले. आपत्तीशी लढा देतांना सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून उपाययोजना व नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.

इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील सुविधांचा आढावा घेतांना राऊत म्हणाले की, मनुष्यबळ कमी पडणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या कोविड योद्धा या उपक्रमातील डॉक्टर व नर्स मिळणार आहेत. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करुन घ्यावेत. कोविड वॉर्डमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना प्रोटोकॉलप्रमाणे सुविधा पुरविण्यात याव्यात. शहरात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना मास्क, हातमोजे व सॅनिटायजर पुरविण्याची सूचना महानगरपालिकेला केल्या. शहरात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना सुविधा पुरविण्यात आल्या असून शहरातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी 170 चमू नियुक्त करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यांना आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहेत, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त श्री.मुंडे यांनी दिली.

माफसू येथील प्रयोगशाळेला मान्यता मिळाली असून ती लवकर सुरु होईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील 1974 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले असून कोविड योद्धाची यादी प्राप्त होताच त्यांनाही प्रशिक्षण देण्यात येईल. कोविड व नॉनकोविड या दोन भागात रुग्णालयाची विभागणी करण्यात आली असून येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची तपासणी करण्यात येत असल्याचे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा यांनी दिली.

शहरात अकारण फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असल्याचे नमूद करुन पालकमंत्री म्हणाले की, अनावश्यक फिरणाऱ्यांना जरब बसायला हवी. आवश्यकता असल्यास नागरिकांनी बाहेर जाणे एकवेळ समजले जाऊ शकते. मात्र अकारण फिरणाऱ्यांना पोलिसांचा धाक असायला हवा असे ते म्हणाले. लॉकडाऊन – 2 मध्ये नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून सोशल डिस्टसींग पाळून बँकेतील व्यवहार सुरळीत व्हावे यासाठी जिल्हाधिकारी यांनी बँकांना निर्देश द्यावेत. नागपूर येथील प्रशासन समन्वयाने काम करत असून सर्व अधिकाऱ्यांनी या आपत्तीचा काळात टीमवर्क म्हणून काम करावे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा प्रशासनामार्फत केला जात असून गरज नसतांना कोणीही बाहेर पडू नये. सोशल डिस्टसींगचे पालन हा एकमेव उपाय असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement
Advertisement