
मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीच्या मदतीची मागणी केली. पिकांचे नुकसान, पाणीटंचाई, चारा आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत याबाबत पवारांनी सरकारचे लक्ष वेधले.
पवारांच्या पत्रावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारने परिस्थिती गांभीर्याने घेतल्याचे सांगितले. “शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी सूचना केल्या आहेत, त्या निश्चितपणे ऐकू,” असे फडणवीस म्हणाले. या पत्राला राजकीय स्वरूप न देता शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून आवश्यक तयारी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
५ ऑक्टोबरनंतर करण्यात येणाऱ्या पंचनाम्यांच्या आधारे केंद्राकडे एनडीआरएफच्या निकषांनुसार मदतीची मागणी केली जाणार आहे. मात्र, केंद्राच्या मदतीची प्रतीक्षा न करता राज्य सरकारच्या निधीतून शेतकऱ्यांना मदत देण्याची तयारी सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. पिण्याचे पाणी आणि गरजेनुसार चाऱ्याची उपलब्धताही सुनिश्चित केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, यावेळी फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेवरही टीका केली. त्यांच्या नेतृत्वावर काँग्रेसमध्येच विश्वास नसल्याचा दावा करत, पराभवापासून लक्ष विचलित करण्यासाठी इतर मुद्दे उपस्थित केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.




