
नागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोदामाचे कुलूप तोडून लाखो रुपयांची सुपारी चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीची सुपारी, दोन चारचाकी वाहने आणि दोन मोबाईल असा एकूण २६ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१२ ते १४ सप्टेंबरदरम्यान पावनगाव येथील डी.के. फार्मजवळील कॅपिटल ट्रेडर्सच्या गोदामात ही चोरी झाली. चोरट्यांनी गोदामाचे कुलूप तोडून सुमारे १८ लाख रुपयांची सुपारी आणि ५ हजार रुपये किमतीचा डीव्हीआर चोरून नेला होता.
तक्रार मिळताच कळमना पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, टोल नाक्यांवरील रेकॉर्ड आणि वाहनांच्या हालचालींचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले. तपासादरम्यान संशयित मालवाहू वाहनाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पाच जणांना अटक केली.
अटक आरोपींची नावे नितेश भवरिया, शुभम मराठे, मोहम्मद शहजाद उर्फ अतीक, मोहम्मद इरफान उर्फ बाबा आणि अरविंद बंटी येडा अशी आहेत. आरोपींकडून १६ लाख २७ हजार रुपयांची चोरीची सुपारी, दोन चारचाकी वाहने आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
आरोपींचा यापूर्वीही गोदामफोड, चोरीसह इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून, कळमना पोलीस पुढील तपास करत आहेत.




