
नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यवहाराविरोधात क्राइम ब्रांचने कारवाई करत ६४ वर्षीय व्यक्तीला डोडा-पोस्तसह अटक केली. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेकानाका, सन्याल नगर परिसरात क्राइम ब्रांच युनिट-५च्या पथकाने ही कारवाई केली.
१७ सप्टेंबर रोजी पथक गस्तीवर असताना प्लॉट क्रमांक १ समोरील सार्वजनिक रस्त्यावर एक संशयित व्यक्ती आढळून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता प्लास्टिकच्या पोत्यामध्ये डोडा-पोस्त आढळून आले. पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाचे वजन सुमारे ६०४ ग्रॅम असून त्याची किंमत अंदाजे १ लाख ४४ हजार रुपये आहे.
या कारवाईत डोडा-पोस्तासह मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि प्लास्टिक पिशवी असा एकूण सुमारे १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीची ओळख ६४ वर्षीय राजेंद्रसिंग बाजवा अशी झाली आहे.
याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. हा अमली पदार्थ आरोपीपर्यंत कुठून पोहोचला आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.




