Published On : Wed, Sep 9th, 2020

‘पोलीस नभोमंडळातील (२१) आयपीएस नक्षत्रं’ या पुस्तकाचे शरद पवार यांच्या हस्ते आज विमोचन

– श्रीमती प्रतिभा बिस्वास यांचे हे पुस्तक स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल

मुंबई – श्रीमती प्रतिभा बिस्वास लिखित ‘पोलीस नभोमंडळातील (२१) आयपीएस नक्षत्रं’ या पुस्तकाचे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज विमोचन झाले.

महाराष्ट्र पोलीस दलाला एक देदीप्यमान इतिहास लाभला आहे. या सक्षम पोलिस दलात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या २१ पोलीस अधिकाऱ्यांची माहिती बिस्वास यांनी मुलाखतींद्वारे संकलित केली आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरेल. केंद्रीय लोकसेवा परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील यशस्वी उमेदवारांची टक्केवारी वाढवण्यासाठी उपयुक्त व प्रेरणादायी पुस्तक म्हणून याचा उल्लेख केला जाईल अशी खात्री शरद पवार यांनी पुस्तकाचे विमोचन करताना व्यक्त केली.


महाराष्ट्राला अनेक नामवंत व कर्तृत्ववान पोलीस अधिकारी लाभले. त्यात वसंत नगरकर, इ.एस.मोडक, जुलियो रिबेरो, अरविंद इनामदार यांची नावे प्रामुख्याने घ्यावी लागतील. या अधिकाऱ्यांच्या कार्यप्रवासातून सर्वांनाच एक नवी प्रेरणा मिळेल असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.


मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद हेमंत करकरे, अशोक कामटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशासाठी बलिदान देऊन मुंबई पोलीस खात्याचा लौकिक जगभरात पोहोचवला. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांच्या कार्याप्रती शरद पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.