Published On : Tue, Jun 9th, 2020

शरद पवारांनी रायगड जिल्हयातील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी…शेतकऱ्यांना दिला धीर

Advertisement

रायगड जिल्हयातील माणगावपासून कोकण दौऱ्याला सुरुवात…

रायगड जिल्ह्यात ‘निसर्गा’ चा तडाखा बसलेल्या गावांची केली पाहणी…

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुंबई ‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे आजपासून कोकण दौर्‍यावर आहेत. रायगड जिल्ह्यातील माणगावपासून नुकसान पाहणीची त्यांनी सुरुवात केली.

आज सकाळी ८.३० वाजता मुंबईतून मोटारीने रायगडकडे प्रयाण केले. सकाळी ११. ३० वाजता माणगाव येथील बाजारपेठेची पाहणी केली त्यानंतर म्हसळा येथील मदरशाला भेट देत नुकसानीची माहिती घेतली. म्हसळा इथेच मोठ्या प्रमाणात शेडचे नुकसान झाले होते त्याची पाहणी केली तसेच स्थानिकांकडून माहिती घेतली. याशिवाय म्हसळा इथल्या रुग्णालयाचे वादळामुळे मोठे नुकसान झाले होते त्याची पाहणी केली.

दिवेआगारचे सरपंच उदय बापट यांच्या चिकू, नारळ बागेचीही पाहणी केली. तसेच त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. शरद पवार यांच्या पाहणी प्रवासात रस्त्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे चित्र दिसून आले तसेच वीजेचे खांब पडल्याचे चित्र होते. श्रीवर्धन, हरिहरेश्वर या नुकसानग्रस्त भागाचीही पाहणी केली. जीवना बंदर येथील रहिवाशांनी आपल्या व्यथा पवारसाहेबांसमोर मांडल्या. त्यात तातडीने वीज पुरवठा सुरू करण्याची व विभागात झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी शरद पवार यांनी कोकणातील शेतकऱ्यांना सरकार तुमच्यासोबत आहे असा दिलासाही दिला.

श्रीवर्धन येथे आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यासमवेत सायंकाळी एक बैठक घेऊन अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे योग्यरीत्या करुन जास्तीत जास्त भरपाई कशी मिळेल यासाठीच्या सूचना केल्या.

बुधवारी सकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीकडे रवाना होणार आहेत. बुधवारी दापोली, मंडणगड येथील नुकसानीची पाहणी करणार आहेतच शिवाय प्रत्यक्ष घटनास्थळी जात कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा देणार आहेत.

दरम्यान रायगड जिल्हयात राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आणि विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार बाळाराम पाटील, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर , श्रीवर्धनचे उपविभागीय अधिकारी अमित शेडगे व इतर अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement