Published On : Thu, Nov 26th, 2026
By Nagpur Today Nagpur News

शरद पवार पुन्हा रुग्णालयात; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट, म्हणाल्या ‘बाबा ऐकतच नाहीत’!

Advertisement

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुन्हा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निर्जलीकरणाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली. तसेच, वडिलांच्या कामाप्रती असलेल्या ओढीचा उल्लेख करत त्यांनी भावनिक भावना व्यक्त केल्या.

सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, डॉक्टरांनी शरद पवार यांना प्रवास टाळण्यास आणि पुरेशी विश्रांती घेण्यास बजावले आहे. मात्र, ते कामात इतके गुंतून जातात की विश्रांतीच्या सूचनांकडेही दुर्लक्ष करतात. ‘बाबा ऐकतच नाहीत, त्यांना काम करायला आवडते,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना मांडल्या. त्याचवेळी पवार यांची प्रकृती ठीक असल्याचे स्पष्ट करून नागरिकांनी व्यक्त केलेल्या सदिच्छांबद्दल आभार मानले.

नोव्हेंबर महिन्यात तिसऱ्यांदा रुग्णालयात-

शरद पवार यांना नोव्हेंबर महिन्यात तिसऱ्यांदा रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. यापूर्वी २ नोव्हेंबरला खोकला आणि छातीत दुखत असल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मुंबईत परतल्यानंतर ४ नोव्हेंबरला त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

छातीतील संसर्गावर उपचार केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते. पुढील उपचार घरीच घेण्यासह पुरेशी विश्रांती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र, आता पुन्हा निर्जलीकरणाचा त्रास उद्भवल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सततच्या धावपळीमुळे डॉक्टरांनी त्यांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.