
नागपूर :नागपूर शहर काँग्रेसमध्ये संघटनात्मक शिस्तीच्या मुद्द्यावरून अंतर्गत मतभेद उफाळून येण्याची चिन्हे आहेत. शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनी पक्षाच्या बैठकींना वारंवार अनुपस्थित राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. सलग किंवा एकूण चार वेळा बैठकींना गैरहजर राहिल्यास संबंधितांचे पद रद्द करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. मात्र, त्यांच्या या निर्णयावर महापालिकेतील विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी आक्षेप घेतल्याने काँग्रेसमधील राजकीय वातावरण तापले आहे.
बारा वर्षांनंतर नेतृत्व बदलले, संघटनेच्या कामकाजातही बदल-
देवडिया काँग्रेस भवन हे नागपूर शहर काँग्रेसच्या राजकारणाचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. गेली बारा वर्षे विकास ठाकरे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा होती. नेतृत्वात बदल झाल्यानंतर प्रफुल्ल गुडधे यांनी संघटनेची जबाबदारी स्वीकारत कामकाजात शिस्त आणण्यावर भर दिला आहे. बूथ अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष तसेच विविध सेलच्या प्रमुखांना प्रत्येक बैठकीला उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. चार वेळा गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे पद रद्द करण्यासोबतच त्यांच्या पक्ष सदस्यत्वावरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या बैठकांमध्ये आता पदाधिकाऱ्यांना हजेरी लावणे अनिवार्य ठरणार आहे.
गुडधेंच्या भूमिकेवर महाकाळकरांचा पलटवार-
पक्षात शिस्त असणे आणि निष्क्रिय पदाधिकाऱ्यांच्या जागी सक्रिय कार्यकर्त्यांना संधी मिळणे आवश्यक असल्याचे गुडधे यांचे म्हणणे आहे. २० मे रोजी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी संघटन सृजन अभियानासह विविध उपक्रमांच्या माध्यमातून पक्षाला सक्रिय करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, त्यांच्या शिस्तीच्या भूमिकेवर संजय महाकाळकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या १५ वर्षांत पक्षाच्या बैठका, आंदोलने आणि मोर्चांमध्ये सहभागी न झालेल्यांनी इतरांना शिस्त शिकवण्यापूर्वी स्वतःची उपस्थिती तपासावी, अशा शब्दांत त्यांनी गुडधे यांच्यावर निशाणा साधला.
जुन्या गटबाजीचे पडसाद पुन्हा उमटणार?
महाकाळकर हे माजी शहराध्यक्ष विकास ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांच्या टीकेला काँग्रेसमधील जुन्या गटबाजीची पार्श्वभूमी असल्याची चर्चा आहे. विकास ठाकरे यांच्या शहराध्यक्षपदाच्या कार्यकाळात डॉ. नितीन राऊत आणि प्रफुल्ल गुडधे यांच्या गटाचे त्यांच्याशी मतभेद असल्याचे बोलले जात होते. पक्षांतर्गत बैठका आणि निवडणुकीतील सहकार्यावरूनही दोन्ही बाजूंमध्ये नाराजी होती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही या मतभेदांची चर्चा रंगली होती.
आता पक्षश्रेष्ठींनी नेतृत्वाची जबाबदारी गुडधे यांच्याकडे सोपवल्यानंतर संघटनेत नवे नियम लागू होत आहेत. मात्र, हा निर्णय पक्षात शिस्त निर्माण करण्यासाठी आहे की जुन्या नेतृत्वाच्या समर्थकांना बाजूला करण्याचा प्रयत्न, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हजेरीच्या नियमावरून सुरू झालेला हा वाद आगामी संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये कोणते वळण घेतो, याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.



