Published On : Fri, Nov 15th, 2019

समाजमाध्यमांच्या काळात मुद्रित वाचनावर भर द्या – शैलजा वाघ-दांदळे

Advertisement

– विभागीय ग्रंथालयात दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन

नागपूर: सद्या समाजमाध्यमांवर सक्रिय राहण्याचा काळ असला तरीही उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी मुद्रित पुस्तके वाचनावर भर दिला पाहिजे, तसेच वाचनासाठी भरपूर वेळही दिला पाहीजे. सततच्या वाचनामुळे वाचकांचे मन, मनगट आणि मस्तक सशक्त बनते, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती शैलजा वाघ-दांदळे यांनी केले. विभागीय ग्रंथालयाच्या वतीने आयोजित दिवाळी अंक प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी विभागीय ग्रंथपाल श्रीमती विभा डांगे, श्रीमती मिनाक्षी कांबळे उपस्थित होत्या.

प्रकाशक बदलत्या काळानुसार आणि वाचकांच्या अभिरुचीनुसार दिवाळी अंकांचे प्रकाशन करत असून, वाचकांना विविध विषयांवरील विशेष दिवाळी अंक सहज आणि अल्पदरात उपलब्ध होत आहेत. वाचकांनी वाचनाची आवड जोपासताना पाल्यांचीही वाचनाची अभिरुची विकसीत करणे आवश्यक आहे. मोबाईलच्या काळात किंडरवरही विविध पुस्तके सहज उपलब्ध होत असली तरीही मुद्रित पुस्तक वाचनाने मन आणि मस्तिष्कांची एकाच वेळी मशागत होते. त्यामुळे वाचलेले साहित्य कायमस्वरुपी लक्षात राहते. बालपणीच्या कविता वा बालगिते आजही आपल्या लक्षात राहतात मात्र मोबाईलवरील विविध समाजमाध्यमांवर वाचलेले आपल्याला आठवत नाही, असे भर देण्याचे आवाहन केले.

यावेळी दिवाळी अंकांची सुरुवात ही वा. रा. कांत यांच्यापासून झाल्याचे सांगून, दिवाळी अंकांची परंपरा आणि प्रदर्शन, दिनविशेषातून व्यक्ती आणि दिनांकांचे महत्त्व अधोरेखीत होते. दिवाळी अंकांमधून वाचकांची बौद्धिक पातळी समृद्ध होत जाते. माहितीच्या काळात माहितीचे पृथ्थकरण झाल्यानंतर त्याचे ज्ञानात रुपांतर होते. त्यामुळे वाचन ही अविरत चालणारी प्रक्रिया असल्याचे यावेळी श्रीमती शैलजा वाघ-दांदळे यांनी सांगितले.

दिवाळी अंकांमधून वर्षभरातील घडामोडींवर आधारीत आढावा घेतला जातो. दिवाळी अंक हे संपूर्ण समावेशक विषयांवरील ठेवा वाचनासाठी ठेवण्यात आला आहे. बदलत्या काळात बालकांवर संस्कार करणे, त्यांचे पालनपोषण करणे, त्यांच्यासाठी शासनाकडून विविध योजनाही राबविण्यात येत आहेत. मात्र बालकांना उपदेश करताना स्वत: पालकांनी त्यांच्या सवयी बदलणे आवश्यक आहे. वाचनाची आवड निर्माण करणे, बालकांसोबत वेळ घालवणे, त्यांच्यासोबत सहली काढणे, त्यांना संस्कारीत गोष्टी सांगणे आवश्यक आहे. पालकांच्या जडणघडणीवर भर देताना पूर्वी शेजारी बालकांवर लक्ष ठेवत असत, आता त्यांची जागा सीसीटीव्ही कॅमेरांनी घेतली असल्याचे श्रीमती डांगे म्हणाल्या. पाल्यांना देशातील संत, महापुरुषांची ओळख करुन देण्याची जबाबदारी पालकांची आहे. पाल्यांना सुसंस्कारीत करायचे असेल तर पालकांनी स्वत:मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, असे यावेळी विभागीय ग्रंथपाल विभा डांगे यांनी सांगितले.

विभागीय ग्रंथालयात दिवाळी अंकांचे प्रदर्शन सुरु असून, या प्रदर्शनात आरोग्य, क्रीडा, विज्ञान, पर्यावरण आदी विविध प्रकारचे 110 दिवाळी अंक प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. यावेळी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

यावेळी श्रीमती मिनाक्षी कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमांच्या यशस्वितेसाठी विभागीय ग्रंथालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी दिवाळी अंक प्रदर्शनाला विद्यार्थी व वाचकप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement