Published On : Mon, Jun 4th, 2018

अमृत फार्मास्युटिकल्सचे शैलेश जोशी यांची आत्महत्या

बेळगाव : तरुण उद्योजक आणि अमृत फार्मास्युटिकल्स कंपनीचे संचालक शैलेश जोशी (४०) यांनी मध्यरात्री आत्महत्या केली. बेळगावच्या विजयनगरमध्ये रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून त्यांनी आयुष्य संपवलं.

माजी महापौर कै. शरद जोशी यांचे ते सुपुत्र होत. रविवारी रात्री दीडच्या सुमारास त्यांनी छातीवर गोळी झाडली. गोळीचा आवाज आल्याने शेजारच्यांनी पोलिसांनी माहिती दिली. कौटुंबिक कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

प्रसिद्ध ‘अमृत मलम’ची निर्मिती करणाऱ्या अमृत फार्मास्युटिकल्सचा विस्तार त्यांनी देशभर वाढवला होता. अमृत मलममुळे त्यांचे नाव देशभर पोहोचले होते. अडीअडचणीत असलेल्यांना मदत करण्यास ते सदैव तत्पर असत.

अनेक सामाजिक संघटनांशी त्यांचे संबंध होते. शैलेश जोशी यांनी भाजपामध्ये प्रवेश करुन आपल्या राजकीय आणि जीवनाची सुरुवात केली होती.