Published On : Fri, Jul 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात उद्या शाही संदलची मिरवणूक; अनेक मार्गांवर वाहतुकीत मोठे बदल, पोलिसांचे नियोजन जाहीर

Advertisement

नागपूर : हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या १०४ व्या वार्षिक उर्सानिमित्त रविवारी (१२ जुलै) नागपूर शहरात भव्य शाही संदल मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत हजारो भाविक, संदल, घोडे, बग्ग्या आणि विविध धार्मिक पथके सहभागी होणार असल्याने शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागपूर वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन जाहीर केले असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हजरत बाबा ताजुद्दीन यांचा १०४ वा वार्षिक उर्स ८ जुलै ते १९ जुलै दरम्यान ताजबाग येथे साजरा होत आहे. या काळात महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी नागपुरात येत आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा धार्मिक सोहळा असलेली शाही संदल मिरवणूक रविवारी सकाळी १० वाजता मोठा ताजबाग येथून प्रारंभ होईल.

ही मिरवणूक मोठा ताजबाग, शितलामाता चौक, भांडे प्लॉट, सक्करदरा, रेशीमबाग, अशोक चौक, गांधी गेट, विटणीस पार्क, अग्रसेन चौक, गांजाखेत, शहीद चौक, गांधी पुतळा, बडकस चौक, महाल, झेंडा चौक, गजानन चौक मार्गे पुन्हा ताजबाग येथे दाखल होणार आहे.

मिरवणुकीदरम्यान तिननल चौक ते शहीद चौक या मार्गावर एकेरी वाहतूक राहणार असून संदल मिरवणूक व दुचाकी वाहनांव्यतिरिक्त इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद असेल.

Advertisement

तसेच सक्करदरा चौक ते चामट चक्की चौक या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड व हलक्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहील. नागपूर–उमरेड आणि उमरेड–नागपूर मार्गावरील वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले असून परिस्थितीनुसार वाहतूक पोलिसांकडून आणखी बदल करण्यात येऊ शकतात.

१२ जुलै रोजी पहाटे १२.०१ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ही वाहतूक अधिसूचना लागू राहणार आहे.

वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त आदित्य मिरखेलकर यांनी नागरिकांनी प्रवासाचे योग्य नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.