नागपूर : नागपूर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत राणा प्रताप नगर परिसरातील आयकॉन स्पा अॅन्ड सलून वर गुन्हे शाखेने धाड टाकली. या कारवाईतून देहव्यवसायास प्रवृत्त केलेल्या दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली असून ₹१६,५२० रोख रक्कमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींची माहिती-
या प्रकरणात स्पा-सलूनचा मॅनेजर रंजीत रमेश हलदार (४७, रा. वर्धमान, कोलकाता) याला अटक करण्यात आली आहे. तर मालक गौरांग संतोष बिष्वास आणि मॅनेजर जगदीश पाटील हे दोघे फरार असून पोलिस त्यांच्या शोधात आहेत.
आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी मुलींना जास्त पैशाचे आमिष दाखवून देहव्यवसाय करण्यास भाग पाडले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
कायदेशीर कारवाई-
आरोपींविरुद्ध भा.दं.सं. कलम १४३(२), ३(५) सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचे पथक-
ही धडक कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेसी, उप आयुक्त (गुन्हे) राहुल माकणीकर, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) अभिजीत पाटील यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.
प्रत्यक्ष कारवाईत पोलीस निरीक्षक राहुल बिरे, सपोनि शिवाजी ननवरे, पोहवा लता गवई, आरती चव्हाण, प्रकाश माथनकर, किशोर ठाकरे, कुणाल बोडखे तसेच सरकारी वाहन चालक कमलेश क्षिरसागर सहभागी झाले. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील अशा अवैध धंद्यांना चाप बसणार असल्याचे बोलले जात आहे.