नागपूर : जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील कन्हान पोलीस ठाण्याच्या कारभारावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. घरात असतानाच तीन नागरिकांना छेडछाडप्रकरणी (कलम ३५४) आरोपी ठरवण्यात आले, असा गंभीर आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.
कोण आहेत आरोपी?
कन्हान पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात प्रशांत वाघमारे, कोठीराम चकोले आणि कुबेर पोटभरे या तिघांना आरोपी करण्यात आले. मात्र, घटनेच्या वेळी आरोपींची उपस्थिती घटनास्थळी नव्हती, असा दावा करण्यात आला.
CCTV व GPS मधून दिले पुरावे-
पत्रकार परिषदेत पिडितांनी CCTV फुटेज आणि मोबाईल GPS लोकेशन दाखवून आपली निर्दोषता सिद्ध केली. या पुराव्यांमधून गुन्ह्याच्या वेळेला ते वेगळ्या ठिकाणी असल्याचे स्पष्ट होत असल्याने “पोलिसांनी तपासाअंती नव्हे तर तपासाआधीच गुन्हा का दाखल केला?” असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
न्यायाची मागणी-
या संदर्भात पिडित नागरिकांच्या वतीने एक शिष्टमंडळाने ग्रामीण पोलीस उपअधीक्षक अनिल मस्के यांची भेट घेतली आणि दाखल एफआयआर रद्द करण्याची मागणी केली. मात्र, या प्रकरणावर पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.या वादग्रस्त प्रकरणामुळे कन्हान पोलिसांच्या कामकाजावर गंभीर शंका उपस्थित होत असून, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.