Published On : Fri, Sep 29th, 2017

नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा तातडीने करा

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतअंतर्गत असलेल्या नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (ता.२९) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभागृहात आयोजित बैठकीत केला.

यावेळी महापौर नंदा जिचकार, दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे, पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, उपायुक्त रंजना लाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
22 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,11,200 /-
Gold 22 KT ₹ 1,03,400 /-
Silver/Kg ₹ 1,33,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पालकमंत्र्यांनी यावेळी आलेल्या तक्रारींचा आढावा घेतला. यात मासोळी बाजाराच्याबाबतचा निर्णयावर त्यांनी पर्यायी व्यवस्था करून देत मार्चपर्यंत ते मोकळे करण्याचे आदेश दिले. हनुमाननगर झोन अंतर्गत येणाऱ्या मनपाने मंजूर केलेल्या रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले नाही. त्याबाबत नासुप्रशी संपर्क साधून १५ दिवसाच्या आत त्याचा योग्य निर्णय घेण्यात यावा, असे आदेश त्यांनी दिले. गांधीबाग उद्यानातील दुरुस्ती, बांधकाम याबाबत बोलताना बावनकुळे यांनी उद्यानाचे डांबरीकरण, नूतनीकरण व सभोवताल संरक्षक भिंत उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा व उद्यानासभोवताल असलेले अतिक्रमण हटवावे, असे आदेश दिले. राहत्याघरी अवैधरित्या फेब्रिकेशनचे वर्कशॉप अतिक्रमण करून लावलेले आहे, अशी एका नागरिकाची तक्रार होती त्यावर बोलताना पालकमंत्र्यानी अतिक्रमण हटवावे व त्याला एक महिन्याचा नोटीस देण्यात यावा, असे आदेशही दिले.

नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील लाईनमन या पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी व पदोन्नती संदर्भात तक्रार होती. महानगरपालिकेच्या नियमानुसार ज्यावेळी आवश्यकता असेल त्यावेळी आकृतीबंधानुसार जाहिरात प्रसिद्ध करून त्यात बदल करावा, असे निर्देशित केले. मस्कासाथ कॉर्पोरेशनजवळ मनपाच्या कोट्यवधीच्या संपत्तीचे भाडे नाममात्र आहे. तेथील जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. या प्रश्नावर बोलताना मनपाच्या जागेचे सर्वेक्षण करण्यात यावे, कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात यावी, असे आदेश त्यांनी दिले.

हुडकेश्वर- नरसाळा विकास कामांचा आढावा पालकमंत्र्यांनी यावेळी घेतला. महानगरपालिका हद्दवाढीअंतर्गत शासनाद्वारे आलेल्या निधीतून त्या भागात विकास कामे करण्यात येत आहे. कामाला गती आणावी. मार्च २०१८ पर्यंत सर्व कामे पूर्ण करा, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.

बैठकीला हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, नगरसेविका स्वाती आखतकर, सहायक आयुक्त महेश धामेचा, सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, कार्यकारी अभियंता डी.डी.जांभूळकर, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजीव जयस्वाल, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता राजेंद्र सोनकुसरे, कार्यकारी अभियंता अनिरूद्ध चौगंजकर, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त सुवर्णा दखने, हनुमनानगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे, लकडगंज झोनचे सहायक आयुक्त सुभाष जयदेव, उपस्थित होते.

Advertisement
Advertisement