Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Sep 29th, 2017

  पंतप्रधानांच्या नेतृत्वात ‘स्वच्छ भारत’ साकारू

  नागपूर: महात्मा गांधींच्या नेतृत्वात स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली नसती तर कदाचित स्वातंत्र्य मिळाले नसते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अस्वच्छतेविरुद्ध लढाई पुकारली आहे. ही लढाई जिंकून ‘स्वच्छ भारता’चे स्वप्न पूर्ण करू, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

  स्वच्छ भारत अभियानांतर्गत १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान ‘स्वच्छता हीच सेवा’ ही मोहीम केंद्र शासनातर्फे राबविण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत शुक्रवारी (ता. २९) नागपूर महानगरपालिकेच्या वतीने यशवंत स्टेडियम येथील क्रीडा प्रबोधिनीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. मंचावर नगरसेविका उज्ज्वला शर्मा, सीआरसीचे संचालक गुरुबक्शचंद जगोटा, पंडित दीनदयाळ संस्थेचे संचालक डॉ. विरल कामदार, भूपेश थूलकर, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार उपस्थित होते.

  पुढे बोलताना ना. रामदास आठवले म्हणाले, गावाची, शहराची स्वच्छता ही ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका यांची जबाबदारी आहे. परंतु आपले गाव, शहर स्वच्छ ठेवणे ही नागरिकांचीसुद्धा जबाबदारी आहे. कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी, कर्तव्य यथोचितरीत्या पार पाडली तर ‘स्वच्छ भारत’ साकारण्यास वेळ लागणार नाही.

  सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत केलेल्या कामांचा हवाला देत ते म्हणाले, दिव्यांगांच्या मदतीसाठी देशभरात आतापर्यंत ५५० शिबिरे घेण्यात आली आहेत. या माध्यमातून त्यांना आवश्यक त्या वस्तूंचे नि:शुल्क वाटप करण्यात आले आहे. डॉ. आंबेडकरांनी दलित समाजाचे अपंगत्व दूर करण्यासाठी चळवळ उभारली. त्याच डॉ. बाबासाहेबांचा आदर्श घेऊन आपण कार्य करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. नागपुरात क्रीडा प्रबोधिनीमध्ये चालविण्यात येणाऱ्या सीआरसी सेंटरला सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे जी मदत करता येईल, ती करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

  प्रारंभी दीप प्रज्वलन करून ना. रामदास आठवले यांनी कार्यक्रमाचे उद्‌घाटन केले. सीआरसी केंद्राच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अभिजित राऊत यांनी केले.

  ना. आठवलेंनी केली यशवंत स्टेडियम परिसराची स्वच्छता
  ‘स्वच्छता हीच सेवा’ या मोहिमेअंतर्गत ना. रामदास आठवले यांनी यावेळी यशवंत स्टेडियम परिसरात हातात झाडू घेऊन साफसफाई केली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेविका उज्ज्वला शर्मा आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. आपला परिसर स्वच्छ ठेवा, असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी यावेळी केले.

  श्रवणयंत्रांचे वाटप
  यावेळी सीआरसी सेंटरच्या माध्यमातून कर्णबधिरांना श्रवणयंत्रांचे वाटप ना. रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. कु. कंचन बोरसे, कु. आनंदी लिखार, अमित गलभी, कु. सरस्वती मालवी, कु. विशाखा भवरे या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात श्रवणयंत्रांचे नि:शुल्क वाटप करण्यात आले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145