Published On : Fri, Dec 21st, 2018

अग्निशमन विभागातील पदोन्नतीचे विषय तात्काळ मार्गी लावा

Advertisement

सभापती लहुकुमार बेहते : अग्निशमन विभागाचा घेतला आढावा

नागपूर : अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या विषयावर निर्णय घेऊन तो विषय तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश अग्निशमन व विद्युत समितीचे सभापती लहुकुमार बेहते यांनी दिले.

अग्निशमन व विद्युत समितीची बैठक मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत त्यांनी हे निर्देश दिलेत. बैठकीला अग्निशमन व विद्युत समितीचे सभापती लहुकुमार बेहते, उपसभापती वर्षा ठाकरे, सदस्य निशांत गांधी, ममता सहारे, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, सहायक आयुक्त महेश धामेचा, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेश उचके, श्री. चंदनखेडे उपस्थित होते.

सदर बैठकीत शुल्क वाढीसंदर्भात चर्चा झाली. अग्निशमन सेवा शुल्का व्यतिरिक्त अग्निशमन विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध प्रमाणपत्रांच्या शुल्कामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव विभागाने मांडला. अग्निशमन सेवा शुल्क हे शासनाच्या निर्देशानुसार घेण्यात येते. मात्र, याव्यतिरिक्त इतर प्रमाणपत्रांसाठी जे शुल्क आकारण्यात येते त्यामध्ये सन २००९ नंतर वाढ झाली नाही. त्यामुळे मनपाच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने शुल्क वाढीसंदर्भात एक समिती गठित करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालात सदर वाढ सुचविली आहे. या दरवाढीवर चर्चा करून मंजुरीसाठी महासभेकडे पाठविण्याचे निर्देश सभापती लहुकुमार बेहते यांनी दिले.

त्रिमूर्तीनगर येथील अग्निशमन स्थानकाच्या बांधकाम प्रगतीचा आढावा घेण्यात आला. अग्निशमन स्थानकाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. उर्वरीत काम एक महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी सभापतींनी दिले. लकडगंज आणि वाठोडा येथील अग्निशमन स्थानकांच्या बांधकामात जे काही अडथळे असतील ते तातडीने दूर करून काम मार्गी लावण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

अग्निशमन विभागातील रिक्त जागा भरण्यासंदर्भातही बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभाग आणि अग्निशमन अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन तातडीने हा विषय मार्गी लावण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

शहरात एलईडी लाईट वाटपाबाबत आणि रस्त्यांमध्ये असलेल्या मनपाच्या विद्युत खांबांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. एलईडी लाईटसंदर्भातील सर्व कायदेशीर अडचणी दूर झाल्या असून नागपूर शहरातील पथदिवे एलईडीमध्ये परावर्तीत करण्याचा प्रकल्प मे-२०१९ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती विद्युत विभागाचे श्री. मानकर यांनी दिली.

बैठकीला अग्निशमन विभागाचे स्थानाधिकारी व अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.