Published On : Fri, Dec 21st, 2018

मंगळवारी, आसीनगर झोन ‘जनसंवाद’मधील तक्रारींचा पालकमंत्र्यांनी केला पाठपुरावा

नागपूर महानगरपालिकेमध्ये घेतली आढावा बैठक

नागपूर: नागपूर महानगरपालिकेंतर्गत मंगळवारी व आसीनगर झोनमध्ये घेण्यात आलेल्या ‘जनसंवाद’मधील शासन स्तरावरील तक्रारींचा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाठपुरावा केला. यासंबंधी शुक्रवारी (ता. २१) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमध्ये आयुक्त सभागृहात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध तक्रारींसंदर्भात आढावा बैठक घेतली.

बैठकीमध्ये महापौर नंदा जिचकार, मंगळवारी झोन सभापती संगीता गिऱ्हे, आसीनगर झोन सभापती वंदना चांदेकर, नगरसेविका विरंका भिवगडे, मंगला लांजेवार, भावना लोणारे, स्नेहा निकोसे, नगरसेवक मनोज सांगोळे, दिनेश यादव, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, राम जोशी, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, सहायक पोलिस आयुक्त पी.एम.कार्यकर्ते, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेंद्र रहाटे, कार्यकारी अभियंता (उत्तर) राजेश मेघराजानी, विभागीय अधिकारी (उत्तर) अनील राठोड, भूमी अभिलेख उपसंचालक बाळासाहेब काळे, नगर भूमापन अधिकारी सविता कडू, सहायक आयुक्त हरिश राऊत, गणेश राठोड, आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसरे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांच्यासह नागपूर सुधार प्रन्यास, पोलिस विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विद्यार्थ्यांसाठी बस, पट्टे वाटप, अतिक्रमण, भूमिगत गडर लाईन, ट्रंक लाईन, बोअरवेल, जीर्ण व्यापारी संकुलाचे नुतनीकरण आदींबाबतच्या समस्यांवर विस्तृत चर्चा करून त्या सोडविण्यासाठी संबंधित विभागाच्या अडचणी दूर करून त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

आसीनगर झोन अंतर्गत शाळा-महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी ये-जा करण्यासाठी तात्काळ बस सुविधा करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले. याशिवाय झोनअंतर्गत येणाऱ्या कामठी मार्गावरील गुरूनानक महाविद्यालयाकडे जाणारा मार्ग अर्धवटच असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी कोणत्या दिशेने मार्ग पूर्ण करता येईल यासाठी नगरसेवकांसोबत दौरा करून त्याबद्दलचा अंतिम अहवाल १५ दिवसांत सादर करून लवकरात लवकर काम सुरू करण्याचेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्देशित केले.

आसीनगर झोनमधील रिपब्लिकन नगरच्या नागरिकांनी पालकमंत्र्यांच्या ‘जनसंवाद’मध्ये मालकी हक्क पट्ट्यांचा विषय मांडला होता. मालकी हक्क पट्टे हा संपूर्ण शहरातील महत्त्वाचा विषय आहे. संपूर्ण शहरातील वस्त्यांचे शासकीय सर्व्हे करण्यात येणार असून या सर्व्हेला मंजुरी प्रदान करणे व येत्या १५ दिवसांमध्ये पट्टे वाटपाचा आढावा घेण्याचे निर्देशही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले.

इंदोरा येथील डब्ल्यूसीएल सोसायटीने सुजाता नगर सोसायटीच्या मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण करण्यात आले आहे. अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकाला नोटीस बजावून नागपूर सुधार प्रन्यासच्या मदतीने नागपूर महानगरपालिकेने संयुक्त कारवाई करणे तसेच याप्रकारेच झिंगाबाई टाकळी येथील विकास आराखड्यातील मार्गाचे आरक्षण हटविण्यात आले आहे. या ठिकाणी वास्तव्यास असलेल्यांची यादी करण्यासाठी मंगळवारी झोनच्या सभापती व सहायक आयुक्त यांनी दौरा करून येथील लोकांच्या समस्या प्रशासनिक कामातील अडचणींची माहिती घेण्यात यावी. या विषयी शिबिर लावून सर्वांच्या समस्या निकाली काढण्यात येईल, असेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

मंगळवारी झोनमधील शिवाजी कॉम्प्लेक्स सोसायटीमध्ये भूमीगत लाईन टाकण्यासंदर्भात ‘जनसंवाद’मध्ये तक्रार आली होती. सदर सोसायटी रेल्वे लाईन लगत असून बाजूलाच झोपडपट्टी आहे. या ठिकाणी अतिक्रमणामुळे भूमिगत गडर लाईन टाकणे शक्य नसल्याचे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले. यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवाजी कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या जागेवर एसटीपी बांधून दिल्यास नागरिकांना सुविधा होणार असल्याचे सांगितले. या कामासाठी पालकमंत्र्यांनी तात्काळ ५० लाख रुपयांची घोषणाही केली. याशिवाय पंजाबी लाईनमध्ये ब्रिटीशकालीन भूमिगत लाईन असून या ठिकाणी ट्रंक लाईन टाकण्याचा प्रस्ताव आहे. १ कोटी ४८ लाख या कामासाठी प्रस्तावित असून या ठिकाणी रेल्वेची नाहरकत घेऊन काम सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. पंजाबी लाईनमधील नागरिकांना भेडसावत असलेली पाण्याची समस्या सोडविण्यासाठी या ठिकाणी बोअरवेल करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र यासाठी रेल्वेची नाहरकत आवश्यक असून ती तात्काळ घेऊन बोअरवेलचे काम पूर्ण करण्याचेही त्यांनी निर्देशित केले.

मंगळवारी झोनमधील पिवळी नदी लगतच्या वसाहतीमध्ये नदीला पूर आल्यास नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरते. या ठिकाणी सुरक्षा भिंतीचे बांधकाम करून आवश्यक त्या त्रुट्या दूर करणे व या जागेवर पट्टे वाटपाची योजना तयार ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. सदर येथील लिंक रोडवरील १६६ दुकानदारांचे गाळे असलेली व्यापारी संकुलाची इमारत जीर्णावस्थेत आहे. या ठिकाणी इमारतीचे नूतनीकरण करण्यासाठी यासंबंधी डिझाईन, पूर्व प्रस्ताव तयार करून महापौर, आयुक्त यांच्या उपस्थितीत गाळेधारकांची बैठक घेणे. या बैठकीमध्ये नूतनीकरणाची इमारती संदर्भात सादरीकरण करून गाळेधारकांना त्याबद्दलची विस्तृत माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करणे व परिसर अपघात मुक्त करण्याचे निर्देशही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.