Published On : Fri, Dec 21st, 2018

नागरिकांच्या व्यक्तीस्वातंत्र्यांवर घाला घालण्याचा सरकारचा प्रयत्नः खा. अशोक चव्हाण

Advertisement

तपास यंत्रज्ञांना दृष्टीदोष झाला आहे का?

मुंबई: देशातील 10 महत्त्वाच्या तपास यंत्रणांना कोणत्याही कॉल आणि इंटरनेट डेटावर नजर ठेवण्याची परवानगी सरकारने दिली आहे. हा नागरिकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा आणण्याचा प्रकार असून काँग्रेस पक्ष याचा तीव्र शब्दात निषेध करत आहे. अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

गांधीभवन येथे पत्रकारपरिषदेला संबोधित करताना खा. अशोक चव्हाण म्हणाले की, केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार सीबीआय, आयबी, एनआयए, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, सक्तवसुली संचनालय, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स, डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स, रॉ, दिल्ली पोलीस आयुक्त, डायरेक्टरेट ऑफ सिग्नल इंटेलिजन्स या दहा एजन्सी लक्ष ठेवणार आहेत. या एजन्सी कोणाचेही फोन टॅप करू शकतात. पूर्वीप्रमाणे आता यासाठी गृहमंत्रालयाच्या परवानगीची गरज नाही. तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किती डेटा आहे? कोणता डेटा आहे? तुम्ही काय पाहता? आणि काय स्टोअर करता? या सर्वांवर आता या एजन्सीजना पाळत ठेवता येणार आहे. म्हणजे सरकार तुमच्या मोबाईल आणि कॉम्प्युटरमध्ये सर्रासपणे डोकावणार आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून लोकांवर पाळत ठेवण्याचे गुजरात मॉडेल मोदी शाह देशभरात लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस पक्ष या निर्णयाचा तीव्र विरोध करत असून सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी खा. चव्हाण यांनी केली.

ते पुढे बोलताना म्हणाले की, सोहराबुद्दीन नावाची व्यक्ती या जगात अस्तित्वात होती का? जर ती व्यक्ती अस्तित्वात होती तर त्या व्यक्तीने स्वतःच स्वतःचा खून करून घेतला असावा. मोदींच्या राज्यात अनेक व्यक्ती अचानक लुप्त होतात आणि पुढे भविष्यात अशा व्यक्तींची नावे दंतकथेत सामिल होतात. ती माणसे अस्तित्वात होती की नाही हे प्रश्न भविष्यात विचारले जातील आणि त्याचेही उत्तर मिळणार नाही. कारण त्याचेही सबळ पुरावे उपलब्ध नसतील अशी तपास यंत्रज्ञांची स्थिती झाली आहे.

मोदी सरकार आल्यानंतर देशातील तमाम तपास यंत्रणांना दृष्टीदोष झालाय की काय? अशी शंका येते कारण त्यांना कोणत्याही केसेसमध्ये पुरावे दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्या दृष्टीची तपासणी करावी लागणार आहे. भाजपाशी संबंधित सर्व आरोपी त्यांना आता संत महात्मे वाटू लागले आहेत आणि भाजपाचा लोकशाही मार्गाने विरोध करणारे सर्व अट्टल गुन्हेगार वाटू लागले आहेत. सोहराबुद्दीन हत्याकांडातील अनेक साक्षीदारांना अचानक उपरती झाली आणि त्यांनी आपले जबाब फिरवले. व सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. नुकतेच एका पोलीस अधिका-याने हरेन पंड्या हत्याकांडाशी या एन्काऊंटरचा संबंध जोडला होता. त्या पोलीस अधिका-याचा आवाजही सरकारी यंत्रणांना ऐकू आला नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

भाजप नेते काका कुडाळकर यांचा काँग्रसे पक्षात प्रवेश

सुभाष मयेकर यांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजप नेते काका कुडाळकर व मुंबईतील शिवसेना नेते सुभाष मयेकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे प्रवक्ते काका कुडाळकर, भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष सर्फराज अब्दुल नाईक यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आज गांधीभवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री नसीम खान, आ. हुस्नबानो खलिफे, आ. सुभाष चव्हाण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, सरचिटणीस राजन भोसले, पृथ्वीराज साठे गजानन देसाई सचिव राजाराम देशमुख, शाह आलम आदी उपस्थित होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी कुडाळकर व त्यांच्या कार्यकर्त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. यावेळी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, काँग्रेस मुक्त भारताच्या वल्गना करणा-यांनी लोकशाहीपेक्षा जनतेपेक्षा आपण श्रेष्ठ अशी भावना निर्माण झाली होती. पाच राज्याच्या निवडणुकीत जनतेने त्यांच्या अहंकाराला पराभूत करून धडा शिकवला आहे. भाजपचे जहाज आता डुबते आहे यात शंका नाही. महाराष्ट्रातही भाजपचे पानिपत होणार आहे. भाजपातून असून आऊटगोईंग सुरु आहे. आगामी काळात भाजपासह विविध पक्षातील अनेक नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.