Published On : Mon, Mar 2nd, 2020

दिव्यांगांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्या – शरद बोबडे

नागपूर: दिव्यांगांच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण करतानाच त्याचे पुढील जीवन सुसह्य करण्यासाठी सामाजिक संस्थांनी मानवतेचा दृष्टिकोन ठेवून कार्य करावे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी आज येथे केले.

भगवान महावीर विकलांग सहायता समिती, जयपूर व महावीर इंटरनँशनल सर्व्हीस ट्रस्ट नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार निवास परिसरात विदर्भातील दिव्यांगांसाठी विविध उपकरणांच्या वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी, न्या. रवी देशपांडे, न्या. एस. बी. शुक्रे, ओडिशाचे लोकायुक्त अजित सिंग, यांच्यासह भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे डी. आर. मेहता उपस्थित होते.

समाजाने मानवी मूल्यांचे संवर्धन करावे. त्याचे सेलिब्रेशन करावे. समाजात वावरताना उत्कट मानवी संवेदनाची जपवणूक करण्याची गरज असून, दिव्यांगांप्रती मानवी दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे डी. आर. मेहता यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. दिव्यांगांनी समाजात चार प्रकारचे आत्मसन्मान गमावेलेले असतात. तो आत्मसन्मान दिव्यांगांना कृत्रिम अवयवांतून मिळवून दिल्यामुळे ते समाजात ताठ मानेने जगतात व आत्मनिर्भर बनतात. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे हास्य आत्मसमाधान मिळवून देत असल्याचे डी. आर. मेहता यांनी सांगितले.

त्यांच्या चेह-यावरील समाधान जगण्याची नवी प्रेरणा देत असून, महात्मा गांधी यांच्या ‘…. पीड पराई जाने रे’ या भजनानुसार जीवनात प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डी. आर. मेहता यांनी भगवान महावीर विकलांग सहायता समितीकडून दरवर्षी करण्यात येत असलेल्या समाजोपयोगी कामाबाबतची माहिती दिली. तसेच दिव्यांगांच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी समाजाने सढळ हाताने दान करुन दिव्यांगांना सहकार्य करताना मानवता, बंधुभाव वाढीस लावण्याचे आवाहन केले.


दिव्यांगांना वाटप केलेल्या उपकरणांबाबत न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आयोजकांचे कौतुक केले. तसेच या कार्यक्रमातील आनंद जगावेगळा असल्याचे सांगत जे निर्मात्याने दिले नाही ते डी. आर. मेहता यांनी दिव्यांगांना मिळवून दिले असल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते दिव्यांगासाठी विशेष कार्य करणा-या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

विधी सेवा प्राधिकरण दिव्यांग, दुर्बल घटकांचे आयुष्य सहज, सुकर आणि सुलभ व्हावे यासाठी कार्यरत आहे. यावेळी साडेतीन हजार दिव्यांगांना तीनचाकी सायकल, व्हीलचेअर, कृत्रिम अंग, जयपूर फूट, कृत्रिम हात, कँलिपर्स, बैसाखी, शूज, बेल्ट, बीटी कान मशीन, काठीचे मोफत वितरण करण्यात आले. डॅनी, बळीराम, जितेंद्र, इच्छा आदिंना प्रातनिधीक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते कृत्रिम उपकरणांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांचीही उपस्थितीही होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मूक-बधीर शाळेतील विद्यार्थ्यानी ‘ऐ मेरे वतन के लोगो व मेरा मुल्क मेरा देश, मेरा ये वतन’ गीतावर अभिनय सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्वरी जोशी यांनी केले. तर भरत पारेख यांनी आभार मानले.