नागपूर : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला असून विदर्भ राज्य आंदोलन समितीने राज्य आणि केंद्रातील विदर्भातील बड्या नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगळ्या विदर्भाबाबत दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, अन्यथा राजीनामा द्यावा, अशी थेट मागणी समितीने केली आहे.
समितीने समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या संदेशातून विदर्भाचा केवळ राजकीय वापर झाल्याचा आरोप करत आता संघर्ष तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. यासाठी ९ ऑगस्ट, क्रांतीदिन निवडण्यात आला असून सकाळी १० वाजता दीक्षाभूमी ते संविधान चौक असा लाँग मार्च काढण्यात येणार आहे.
या मोर्चातून वेगळ्या विदर्भाच्या मागणीसह विदर्भातील मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून शांत असलेला वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची चिन्हे दिसत आहेत.





