Published On : Sat, Nov 16th, 2019

कचरा विलग करुनच यंत्रणेकडे सोपवा

Advertisement

महापौर नंदा जिचकार यांचे आवाहन : कचरा संकलनाच्या नव्या यंत्रणेचे लोकार्पण

नागपूर : नागपूर शहर स्वच्छ व सुंदर राहावे, शहरात कुठेही घाण राहणार नाही आणि निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया व्हावी ही यंत्रणेसोबतच शहरातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यासाठी दोन कचरापेट्या ठेवून ओला आणि सुका कचरा हा तेथेच विलग करा. तो उचलून नेण्याची आणि त्यावर योग्य प्रक्रिया करण्याची जबाबदारी मनपा आता नव्या यंत्रणेच्या माध्यमातून जोमाने पार पाडणार आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

नागपूर शहरातील नव्या कचरा संकलन यंत्रणेचे लोकार्पण भांडेवाडी येथे महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.१५) पार पडले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजीत बांगर, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, उपसभापती नागेश सहारे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, नगरसेविका मनिषा कोठे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, नागपूर शहरात कुठेही कचरा दिसणार नाही यादृष्टीने नव्या यंत्रणेला काम सोपविण्यात आले आहे. नव्या यंत्रणेच्या माध्यमातून पूर्णपणे यांत्रिकीकृत वाहने शहराच्या सेवेत असतील. या नव्या यंत्रणेच्या माध्यमातून निर्मिती स्थळावरूनच कचऱ्याचे विलगीकरण करण्यात येईल आणि त्याच पद्धतीने प्रक्रियेसाठी तो पुढे नेण्यात येईल. यंत्रणेसोबतच नागरिकांची जबाबदारी वाढली आहे. लोकसहभागाशिवाय कुठलेही अभियान शक्य नाही. लोकांनी ठरविले तर या यंत्रणेला सहकार्य करून स्वच्छ अभियानात शहर क्रमांक १ वर येउ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जुनी कचरा संकलन व व्यवस्थापन यंत्रणा कनक रिसोर्सेसचे कर्मचारी हे या दोन्ही एजन्सींनी घेतले असून या कर्मचाऱ्यांनी जोमाने व प्रामाणिकपणे कार्य करावे, असेही महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा बोलताना म्हणाले, आता आपले शहर पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ व सुंदर दिसणार आहे. पूर्वीच्या कचरा संकलन यंत्रणेपेक्षा तिप्पट सुविधा या दोन्ही यंत्रणा आपल्यासाठी देणार आहे. शहरातील कचरा संकलन केंद्र कमी केले असून आता फक्त २५ ठकाणी कचरा ट्रांन्सफर युनिट असणार असून त्याठिकाणाहून कचरा थेट प्रक्रिया केंद्रात नेल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या स्वच्छतेच्या योगदानात नागरिकांचाही सहभाग तितकाच महत्वाचा असून नागरिकांनी घरातील कचरा विलग करूनच द्यावा. याबाबत यंत्रणेने सुरूवातीला नागरिकांना जागृत करणे आवश्यक आहे. नागरिक काही दिवस कचरा एकत्र देतील. नागरिकांना आपण कचरा विलगीकरणासंदर्भात माहिती देणे गरजेचे आहे, असेही वीरेंद्र कुकरेजा यांनी सांगितले.

कचरा संकलन व व्यवस्थापनासाठी दोन एजन्सी
नागपूर शहराची रचना प्रशासकीयदृष्ट्या दहा झोनमध्ये करण्यात आली आहे. या दहाही झोनमध्ये कचऱ्याचे संकलन व व्यवस्थापन योग्यरित्या व्हावे आणि नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी कामाचे विभाजन करून दोन एजन्सींना ही जबाबदारी देण्यात आली आहे. ए.जी. एन्व्हायरो ही एजन्सी शहरातील झोन क्रमांक १ ते ५ तर बी.व्‍ही.जी. ही एजन्सी झोन क्रमांक ६ ते १० मध्ये कचरा संकलन व व्यवस्थापन करेल. नवीन यंत्रणेकडे असलेल्या नव्या वाहनांमध्ये तीन कंटेनर असून ओला, सुका व धोकादायक कचरा निर्मिती स्थळापासून स्वतंत्र ठेवण्यात येईल. कचरा संकलनासाठी येणाऱ्या घंटागाडीवर उद्घोषणेची व्यवस्था असून त्यावर वाजणाऱ्या गाण्यांमुळे घंटागाडी आल्याचे नागरिकांना समजेल. शहरात २५ ट्रान्सफर स्टेशनची निर्मिती करण्यात आली असून घराघरातून संकलीत होणारा कचरा ट्रान्सफर स्टेशनच्या माध्यमातून भांडेवाडी येथील कचऱ्यावरील प्रक्रिया केंद्रावर नेण्यात येईल. कचरा संकलनाचे काम वेगवेगळ्या पाळीमध्ये चालणार असून आजपासून बाजार परिसरातील कचरा दुपारनंतर व हॉटेल्स तसेच भोजनालयातील कचरा रात्रपाळीतच उचलण्यात येईल. नव्या निर्णयानुसार जो कचरा विलग करुन देणार नाही, त्यांच्याकडून कचरा उचलण्यात येणार नाही.

…तर करा टोल-फ्री क्रमांकावर कॉल
शहरात कुठेही कचरा आढळत असेल किंवा घरातून कचरा उचलला गेला नसेल तर नागरिकांना टोल-फ्री क्रमांकावर कॉल करता येईल. १८००२६७७९६६ हा टोल-फ्री क्रमांकसुद्धा आज नागपूर महानगरपालिकेने जारी केला आहे.

कार्यक्रमाचे संचालन व आभार अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले. कार्यक्रमाला आरोग्याधिकारी डॉ.सुनील कांबळे, स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, पशुचिकित्सक डॉ.गजेंद्र महल्ले, नेहरूनगर झोन सहायक आयुक्त स्नेहा करपे, ग्रीन व्हिजीलचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, बीव्हीजीचे अमोल माने, एजीचे आशुतोष देशपांडे, स्वास्थ निरिक्षक रोहिदास राठोड यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.