नागपूर :नागपूर शहर पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या सावटाखाली आले आहे. बुधवारी (२३ जुलै) दुपारी सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवाहरलाल नगर शाळेजवळील इंदिरा कॉन्व्हेंटच्या परिसरात एक धक्कादायक घटना घडली. ५० वर्षीय माया बाई मदन पेसरकर यांची अज्ञात हल्लेखोराने गळा चिरून निर्घृण हत्या केली.
मृत महिला परिसरातीलच-
मायाबाई पेसरकर या त्या परिसरातीलच रहिवासी होत्या. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. महिला कोणाशीही बोलाचाली न ठेवणाऱ्या, साध्या स्वभावाच्या होत्या, अशी माहिती स्थानिकांनी दिली.धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून ही हत्या करण्यात आली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून अनेकांचे डोळे पाणावले. रस्त्यावरून जाणाऱ्यांचेही रोंगटे उभे राहिले.
पोलीस यंत्रणा अलर्ट-
घटनेची माहिती मिळताच सीताबर्डी पोलीस, गुन्हे शाखेचा पथक व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेत पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
हत्या का झाली? उत्तर अजूनही अंधारात
या अमानुष कृत्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. वैयक्तिक वाद, मालमत्तेचा वाद की पूर्वीचा कुठला शत्रुत्वाचा हिसाब — हे सर्व पैलू तपासले जात आहेत.
स्थानीय नागरिक भयभीत-
या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हत्येचा जलद शोध लावण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पोलिसांचा सखोल तपास सुरू-
सीताबर्डी पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी सर्व शक्य कोनातून तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब, आणि मृत महिलेच्या वैयक्तिक आयुष्यातील माहिती तपासली जात आहे.