नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर, निवडणूक आयोगाने त्यांच्या उत्तराधिकारीच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आयोगाने २३ जुलै रोजी एक अधिकृत निवेदन जारी करून ही माहिती दिली. गृह मंत्रालयाकडून २२ जुलै रोजी धनखड यांच्या राजीनाम्याची अधिकृत माहिती देण्यात आली होती. त्यानंतर लगेचच निवडणुकीच्या प्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आली आहे.
संविधानाच्या कलम ६८ अंतर्गत, उपराष्ट्रपतीपद रिक्त झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर निवडणूक घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे निवडणूक आयोग लवकरच उपराष्ट्रपती निवडणुकीची तारीख जाहीर करणार आहे.
उपराष्ट्रपतीपदासाठी संसदेमधील दोन्ही सभागृहांचे निवडून आलेले तसेच राष्ट्रपतीने नियुक्त केलेले सदस्य मतदान करतात. इच्छुक उमेदवारांना ठरावीक नियम व अटींचे पालन करावे लागते. यात प्रस्तावक व समर्थकांची संख्या, तसेच अनामत रक्कम भरावी लागते.
दरम्यान, धनखड यांनी आरोग्य कारण देत राजीनामा दिला असला तरी त्यांच्या निर्णयावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांनी यामागे सरकारसोबत मतभेद असल्याचा संशय व्यक्त केला असून, अद्याप यावर सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. उपराष्ट्रपतीपदासाठी कोण कोण रिंगणात उतरणार, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.