
नागपूर : हजारी पहाड परिसरात सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण आग लागून पाच घरे पूर्णपणे जळून खाक झाली. आग काही क्षणांतच वेगाने पसरल्याने घरातील टीव्ही, फ्रिज, दुचाकी, घरगुती साहित्य तसेच महत्त्वाची कागदपत्रे आगीत जळून राख झाली. दरम्यान, आगीच्या भीषणतेत तीन गॅस सिलिंडर फुटल्याने परिसरात काही काळ मोठी अफरातफर माजली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. पहाटे सुमारे 4 वाजता भाजप झोपडपट्टी मोर्चा नागपूर शहराचे महामंत्री रमेश कालमेघ यांनी नगरसेवक विजय होले यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर विजय होले यांनी पोलिस आणि अग्निशमन विभागाशी संपर्क साधून तातडीने मदत उपलब्ध करून दिली.
सुमारे 4.30 वाजता अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली. या आगीचे नेमके कारण आणि झालेल्या नुकसानीचा अधिकृत आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.
या दुर्घटनेत मेघा खोब्रागडे, कोटी होले, रितेश मेश्राम, मुकेश गौरी आणि सावंत राऊत यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. घरातील सर्व साहित्य आगीत जळाल्याने संबंधित कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. पीडित कुटुंबांनी प्रशासनाकडे तातडीने आर्थिक मदत, पुनर्वसन आणि योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.




