
नागपूर : शहरात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याची खुलेआम विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. लकडगंजमधील सतनामी नगर चौकात असलेल्या ‘हीरा पान पॅलेस’वर एस्कॉर्ट पथकाने छापा टाकून तब्बल 95 हजार 776 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
एस्कॉर्ट पथकाचे प्रमुख एपीआय भगवान कोळी यांना पानठेल्यावर प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्याची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पथकाने लकडगंज पोलिसांसह ठिकाणी धाड टाकली. यावेळी झडतीमध्ये 89 हजार 146 रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पान मसाला आढळून आला.
पोलिसांनी विमल, राजश्री, पान पराग, बाबा नवरतन, रजनीगंधा यांसह विविध प्रकारचा माल ताब्यात घेतला. त्याचबरोबर प्रतिबंधित सिगारेट आणि 16 हजार 630 रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली.
या प्रकरणी 25 वर्षीय बादल मोतीलाल काटोके, रा. भरतवाडा, पुनापूर, पारडी याच्याविरोधात अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय भगवान कोळी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.




