नागपूर: नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार श्री तुळशीदास भगवंत गोल्हर यांचे आज (गुरुवार) पहाटे दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८६ वर्षे होते. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, एक अनुभवी, अभ्यासू आणि तत्त्वनिष्ठ पत्रकार हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
मूळचे माणिकवाडा (धनज), ता. नेरपरसोपंत, जि. यवतमाळ येथील असलेले श्री. गोल्हर यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक दशकांपर्यंत उल्लेखनीय कार्य केले. त्यांनी आपल्या निर्भीड लेखणी, सामाजिक बांधिलकी आणि पत्रकारितेतील निष्ठेमुळे पत्रकार विश्वात मानाचे स्थान निर्माण केले होते. नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पत्रकारांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
त्यांच्या पार्थिवावर आज, दि. २ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजता अंबाझरी घाट, नागपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच बराच मोठा परिवार आहे. श्री. तुळशीदास गोल्हर यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील एक ज्येष्ठ, अनुभवी व मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असून, विविध स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.




