Published On : Tue, Nov 19th, 2019

आपसात भांडून दोघांचे नुकसान: मोहन भागवत

Advertisement

नागपूर: ‘आम्ही जर निसर्गाला नष्ट केले, तर आपण स्वत: नष्ट होऊन जाऊ. असे असतानाही निसर्गाला नुकसान पोहोचविण्याचे काम सुरूच आहे. अशाच प्रकारे आपण हेही जाणतो की, आपसात भांडून दोघांचे नुकसान होईल, तरी देखील भांडणे काही थांबत नाहीत,’ असे सूचक वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. भागवत यांचे हे वक्तव्य राज्यात निर्माण झालेला सत्तापेच आणि भाजप-शिवसेनेत सुरू असलेल्या कलगीतुऱ्याबाबत असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधील एका कार्यक्रमात भागवत बोलत होते. भागवत पुढे म्हणाले की, स्वार्थ हा वाईट आहे हे सर्वानांच माहीत आहे. मात्र, आपला स्वार्थ सोडणे हे अतिशय कमी लोकांनाच जमते. मग तो स्वार्थ एखाद्या देशाचा असो वा व्यक्तीचा.

राज्यातील जनतेने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला जनादेश दिलेला असतानाही हे दोन पक्ष मुख्यमंत्रिपद आणि समान सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून एकमेकांपासून अलग झाले आहेत. मुख्यमंत्रिपदासह समान सत्तावाटपाचे आश्वासन भारतीय जनता पक्षाने आपल्याला दिलेले असल्याचे शिवसेनेने म्हटले असताना, भारतीय जनता पक्षाने मात्र असे आश्वासन कधीही दिलेले नसल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर या दोन पक्षांमधील संबंध तुटल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत सत्ता स्थापनेसाठी चर्चा सुरू झाली असून भाजप आणि शिवसेनेकडून मात्र एकमेकांच्या विरोधात वक्तव्ये येत राहिली. मध्यस्थीची गरज भासल्यास आपण मध्यस्ती करण्यास तयार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले असले, तरी तसा प्रयत्न अद्याप झालेला नाही. इतकेच नाही तर शिवसेनेच्या केंद्रातील मंत्र्याने राजीनामा दिल्यानंतर भाजपने शिवसेनेला एनडीएबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भेटीगाठी होऊन या तीन पक्षांमध्ये संवाद सुरू झाला आहे.

दरम्यान, मोहन भागवत यांनी हे सूचक विधान केले असले तरी देखील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत चर्चा सुरू होईल अशी परिस्थिती नाही. उलट राज्यात पुढील आठवड्यात सरकार स्थापन होईल अशी सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रम ठरला असून तिन्ही पक्षांची या कार्यक्रमावर जवळ-जवळ सहमती झालेली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. पहिल्या टर्ममध्ये शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळणार असून काँग्रेस पक्षाला विधानसभेचे अध्यक्षपद मिळेल अशी सूत्रांची माहिती आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख कोण आहेत?
मोहन भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख म्हणजेच सरसंघचालक आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोठे आहे?
महाराष्ट्रातील नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर किती वेळा बंदी घातली गेली?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर एकूण चार वेळा बंदी घालण्यात आली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश काय आहे?
हिंदू राष्ट्रवाद हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश आहे.
भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाग आहे का?
भारतीय जनता पक्ष हा उजव्या विचाराचा पक्ष आहे. हिंदू राष्ट्रवाद ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणेच भारतीय जनता पक्षाचीही विचारधारा आहे.