नागपूर : अमेरिकेच्या ‘ट्रम्प टॅरिफ’ धोरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर, भारताने स्वबळावर आधारित विकासाचा मार्ग स्वीकारायला हवा, असा स्पष्ट संकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिला आहे. नागपुरात कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या डॉ. हेडगेवार आंतरराष्ट्रीय गुरुकुलाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
भारताची ताकद स्वत्वातच –
“भारताला आता आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे. आपल्या बळावरच आपली प्रगती शक्य आहे. बळ, ओज व लक्ष्मी यांचा उगम ‘स्वत्वा’तून होतो. जेव्हा आपले स्वत्व आपण विसरतो, तेव्हा अधःपतन सुरू होते,” असे भागवत यांनी स्पष्ट केले. त्यांनी इतिहासाचा दाखला देत सांगितले की, इसवी सन 1 ते 1600 पर्यंत भारत जगाच्या आघाडीवर होता, कारण त्यावेळी आपण आपल्या परंपरा आणि स्वत्वाशी जोडलेले होतो. परकीय आक्रमणांनंतर आपले स्वत्व हरवले गेले, आणि आपली अधोगती झाली, असेही त्यांनी नमूद केले.
संस्कृत ही स्वभावाची भाषा –
संस्कृत भाषेबाबत बोलताना भागवत म्हणाले की, “भाषा ही समाजाच्या स्वभावाचा आरसा असते. संस्कृतमधून आपली परंपरा, भाव आणि ज्ञान विकसित झाले आहे. त्यामुळे संस्कृत भाषेला केवळ राजाश्रय नव्हे, तर लोकाश्रयदेखील मिळायला हवा.”
त्यांनी पुढे सांगितले की, संस्कृत ही विज्ञाननिष्ठ, संपन्न आणि अनेक भारतीय भाषांची जननी असलेली भाषा आहे. आज ती केवळ शैक्षणिक पाठ्यक्रमापुरती मर्यादित न राहता, जनमानसात वावरायला हवी. “संस्कृत समजत नसेल तरी पाठांतराच्या परंपरेमुळे ती अनेक घरांमध्ये आजही अस्तित्वात आहे. या भाषेचे सर्वसामान्य जीवनात पुनरागमन झाले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.
संस्कृत विद्यापीठांनी घ्यावा पुढाकार-
भागवत यांनी संस्कृत विद्यापीठांना आवाहन करत सांगितले की, “संस्कृतचा प्रसार आणि वापर वाढवण्यासाठी शैक्षणिक संस्था, विशेषतः विद्यापीठांनी पुढाकार घ्यायला हवा. भाषेच्या विकासासाठी केवळ सरकारी आधार नव्हे, तर समाजाचा सक्रिय सहभागही गरजेचा आहे.”
या संपूर्ण भाषणातून भागवतांनी भारताच्या आर्थिक, सांस्कृतिक आणि भाषिक स्वावलंबनाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. भारताला जर आत्मनिर्भर व्हायचं असेल, तर केवळ बाह्य धोरणांचा विचार न करता आपल्या सांस्कृतिक मुळांशी नाळ जुळवणे अत्यंत आवश्यक आहे, असा त्यांचा स्पष्ट संकेत आहे.