Published On : Fri, Jun 30th, 2017

महिला व बाल कल्याण समिती द्वारा महिला बचत गटांना जैविक खतांमार्फत मिळणार स्वयंरोजगार

Advertisement


नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीद्वारा महिला बचत गटाच्या महिलांना जैविक खतांमार्फत स्वयंरोजगार देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे यांनी दिली.

शुक्रवारी (ता.३०) मनपा मुख्यालयात आयोजित महिला व बाल कल्याण समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी उपसभापती श्रद्धा पाठक, समिती सदस्या परिणिता फुके, तारा (लक्ष्मी) यादव, दिव्या धुरडे, उपायुक्त डॉ.रंजना लाडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

पुढे बोलताना श्रीमती ठाकरे म्हणाल्या, महिला बचत गटांमार्फत जैविक खत तयार करून नागपूर महानगरपालिकेच्या उद्यानास ते पुरविण्यात येणार असून याद्वारे महिलासाठी स्वयंरोजगार निर्माण होणार आहे. प्रत्येक महिला बचत गटांना एक उद्यान वितरीत करून त्याद्वारे त्या उद्यानाचे संगोपन व संवर्धन त्या बचतगटाक़डे असणार आहे. त्याचप्रमाणे शासनाचा वृक्षलागवड व संवर्धन या कार्यक्रमाअंतर्गत महानगरपालिकेच्या अख्यत्यारित येणाऱ्या मोकळ्या जागेत महिला व बाल कल्याण समितीद्वारे त्याठिकाणी वृक्षरोपण करण्यात येणार असून समितीद्वारे व बचतगटांमार्फत त्या वृक्षांचे संवर्धन करण्यात येणार असल्याची माहितीही सभापती वर्षा ठाकरे यांनी दिली.

बैठकीला शाळा निरीक्षक संजय दिघोरे, शारदा भुसारी,उज्ज्वला पहाडे, नूतन मोरे, चंद्रशेखर पाचोडे, विकास बागडे आदी उपस्थित होते.