Published On : Thu, Jul 27th, 2017

चांडोली, खेड, मावळ येथील वीज उपकरणे सुरक्षित : ऊर्जामंत्री

C Bawankule
मुंबई:
पुणे जिल्हयातील चांडोली, खेड, मावळ तालुक्यातील वीज दुरूस्ती साहित्य व उपकरणे सुरक्षित आहेत. या साहित्याची यादी आपल्याकडे आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी हा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या उत्तरात ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सभागृहात सांगितले की, एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीवरुन हा प्रश्न निर्माण झाला. वृत्तपत्रातील बातमी वस्तुस्थितीला धरुन नाही. वीज दुरुस्ती साहित्य बेवारस नाही व भांडारही सुरक्षित आहे. ज्या कामासाठी हे साहित्य आणण्यात आले त्या कामासाठीच वापरण्यात येणार असून ते लवकर वापरले जाईल याची काळजी शासन घेईल. आतापर्यंत कुठेही नुकसान झाले नाही.

वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही उपकरणे निकामी होण्याची शक्यता ऊर्जामंत्र्यांनी फेटाळून लावली. खेड, मावळ, या तालुक्यांसाठी वारण्यात येणारी विजेची उपकरणे चांडोली येथील भांडारात सुरक्षित ठेवण्यात आली असल्याचे ही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

सकारात्मक भूमिका ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या उत्तराने समाधान झाल्यामुळे आ. प्रा. कवाडे यांनी बावनकुळेचे कौतुक करीत सकारात्मक भूमिका असलेले ऊर्जावान ऊर्जामंत्री असा उल्लेख सभागृहात केला. बावनकुळे आमच्या विदर्भाचे आहेत पण महाराष्ट्रातील प्रश्नांचाही सकारात्मक विचार करण्यात असे ही आ. कवाडे यावेळी म्हणाले.