Published On : Fri, Feb 21st, 2020

सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये आरपीएफची धाड

Advertisement

– बेवारस मद्यसाठा हस्तगत, नागपूर रेल्वे स्थानकावर कारवाई

नागपूर: आरपीएफच्या विशेष पथकाने दाणापूर -सिकंदर एक्स्प्रेसमध्ये धाड मारली. गाडीचा ताबा घेवून झाडाझडती घेतली असता एका डब्यात आठ बेवारस बॅग आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली. सावधगिरी बाळगत आठही बॅग खाली उतरविल्या असता त्यात मद्यसाठा आढळला. ही कारवाई गुरूवारी दुपारी नागपूर रेल्वे स्थानकावर करण्यात आली.

अंमलीपदार्थाच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी आरपीएफने विशेष पथक तयार केले. या पथकात उपनिरीक्षक जी.एस. एडले, सउनि रामनिवास यादव, शशीकांत गजभिये, दीपक पवार, नितेश ठमके, प्रवीण चव्हाण यांचा समावेश आहे. दुपारच्या सुमारास पथकाने फलाट क्रमांक ३ वर थांबलेल्या १२७९२ दाणापूर -सिकंदराबाद एक्स्प्रेसवर धाड मारली. गाडीचा ताबा घेवून संपूर्ण डब्यांची झाडाझडती घेतली. यावेळी शेवटच्या जनरल कोचमध्ये ८ बॅग बेवारस स्थितीत आढळल्या. याबॅगसंदर्भात बोगीतील प्रवाशांना विचारपूस केली. मात्र, बॅगवर कोणीही हक्क सांगितला नाही.

Advertisement

दरम्यान गाडी सुटण्याचीही वेळ झाली होती. सावधगिरी बाळगत आठही बॅग खाली उतरविण्यात आल्या. आरपीएफ ठाण्यात आणल्यानंतर पंचासमक्ष बॅग उघडल्या असता त्यात मध्यप्रदेश निर्मीत विदेशी दारूच्या ५२० बाटल्या (qकमत ३३ हजार ८०० ) आढळल्या. संपूर्ण बाटल्या हस्तगत करून रेल्वे नियमानुसार कायदेशिर कारवाई करण्यात आली. आरपीएफ निरीक्षक आर. आर. जेम्स यांच्या आदेशानुसार पुढील कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविण्यात आले. ही कारवाई मध्य रेल्वेचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त (विभागीय) भवानी शंकर नाथ यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.