नागपूर : राज्यातील काही अल्पसंख्यांक शाळांमध्ये मराठी विषय शिकवला जात नसल्याची गंभीर बाब विधानसभेत समोर आली आहे. नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी हे प्रकरण उपस्थित करत या शाळांमध्ये मराठी शिक्षकांची नियुक्ती न होणे आणि विद्यार्थ्यांना मातृभाषेपासून वंचित ठेवण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
दटके यांनी सरकारकडे मागणी केली की, अशा शाळांमध्ये मराठी शिक्षक अनिवार्यपणे नियुक्त करावेत आणि मराठी विषयाला बगल देणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच, ‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरती प्रक्रियेत विभागीय आरक्षण आणि प्राधान्य देण्याचीही मागणी त्यांनी केली.
या मुद्यावर उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांनी आश्वासन दिलं की, मराठी विषय न शिकवणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाईल आणि शिक्षक भरती प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्यात येतील.